‘स्वराज्यरक्षक संभाजी’या मालिकेवरूनशिवसेनेच्या खोतकर आणि राष्ट्रवादीचे खा. कोल्हेंमधील ‘मतभेद’ चव्हाट्यावर

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – स्वराज्यरक्षक संभाजी या झी मराठी वाहिनीवरील मालिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला छत्रपती संभाजी महाराजांविषयी माहिती समजली. आता संभाजी महाराजांना अटक झालेली आहे. अटकेनतंर संभाजी महाराजांचे जे हाल केले , संपूर्ण जगाला माहित आहे. त्यामुळे ते चित्रिकरणाच्या माध्यमातून लोकांना दाखवू नयेत, असे मत शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले आहे. मालिकेचा शेवट दाखवण्यावरून खोतकर आणि मालिकेत संभाजीची भूमिका साकारणारे आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

अर्जुन खोतकर यांनी मालिकेचा शेवट न दाखवण्याची मागणी केल्यानंतर यावर अमोल कोल्हे यांनी खुलासा केला. यावर खोतकर यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. खोतकर म्हणाले, माझे आणि आमोल कोल्हे यांच्याशी प्रदीर्घ बोलणे झाले होते. पण त्यांची काय मजबुरी आहे हे कळत नाही. त्यांनी हेही सांगितले होते की हा सर्व अधिकार झी समूहाचा आहे. मात्र, त्या समूहाला मी आणि ते दोघेही बोलणार होतो. मला हा विषय वादाचा करायचा नाही, माझी भूमिका मांडण्यासाठी मला इतरही व्यासपीठ उपलब्ध असून आम्हा शिव आणि शंभूप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा, असे खोतकर म्हणाले.

अमोल कोल्हेंनी खोतकरांचा दावा खोडला
मुळात मागील अडीच वर्षे ही मालिका सुरु आहे. जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभानाने ही मालिका केली आहे. माजी मंत्री खोतकर यांच्या भावनांचा आदर आहे. परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय झी मराठी वाहिनीचा असेल असे कोल्हे यांनी सांगितले.