राष्ट्रवादी आमदार संदीप नाईक हल्ला प्रकरण, शिवसेना नगरसेवकांना अटक !

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनसाईन – आमदार संदीप नाईक यांच्यावर शिवसेनेचे नगरसेवक एम के मढवी आणि त्यांच्या गुंडांनी शुक्रवारी जीवघेणा हल्ला केला. आमदार नाईक यांच्यावर लोखंडी सळया, कैची आदी शस्त्रांनी हल्ला करण्यात आला तसेच त्यांची गाडी देखील फोडली. या प्रकरणी शिवसेनेच्या दोन नगरसेवकांना अटक करण्यात आली आहे. शिवसेनेचे एरोलीचे नगरसेवक एम.के. मढवी, करण मढवी यांना रबाळे पोलिसांनी अटक केली.

दरम्यान पालिकेच्या सभागृह उद्घाटन प्रसंगी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती, यावेळी संदीप नाईक यांच्यावर आणि गाडीवर हल्ला झाला होता. शिवसेना नगरसेवकांनी हा हल्ला केला होता. त्यामुळे शिवसेना नगरसेवक एम के मढवी, करण मढवी यांना रबाले पोलीसांनी अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

ऐरोली सेक्टर ५ येथील नवी मुंबई महापालिकेने बांधलेल्या एका सभागृहाच्या उद्घाटनासाठी आमदार संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे आदी मान्यवर सकाळी १०.३० च्या दरम्यान गेले होते. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार नाईक यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

या समारंभप्रसंगी राजकीय श्रेयवादातून नगरसेवक एम. के. मढवी याने आमदारांना कुणी बोलावले?  ते येथे कसे आले? असे प्रश्‍न विचारुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नगरसेवक मढवी हा आपली पत्नी आणि मुलासह आमदार नाईक यांच्या अंगावर धावून आला. कार्यक्रमप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आमदार नाईक हे समंजसपणे तेथून निघाले. त्यावेळेस नगरसेवक करण आणि त्याचे साथीदार त्यांच्या अंगावर धावून गेले.