कोकणात शिवसेनेच्या मंत्र्याला धक्का, राष्ट्रवादीची मोठी खेळी !

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते दीपक केसरकर यांच्या विरोधात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवीन खेळी खेळली आहे. सावंतवाडीचे नगराध्यक्ष आणि दीपक केसरकरांचे कट्टर समर्थक बबन साळगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

ईडी प्रकरणावरून घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अशातच साळगावकर यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. साळगावकर हे आगामी विधानसभेची निवडणूक लढवणार असून त्यांनी थेट केसरकारांना आव्हान दिले आहे. यामुळे ऐन निवडणुकीत केसरकारांना आपल्याच समर्थकाच्या विरोधात आगामी विधासभा लढवावी लागणार आहे.

शरद पवारांच्या खेळीने बदलले राजकीय समीकरण
विधानसभेची घोषणा झाल्यानंतर राज्यात बीजेपीच सरकार यायला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही असं वाटत असताना अचानक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव बँक घोटाळ्यात ईडीने घेतले आणि पवार पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आले. ईडीने केलेल्या या अचानक कारवाईमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले. या सर्व गोष्टींचा राष्ट्रवादीला मोठा फायदा होणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

सर्वच पक्षांकडून शरद पवार यांच्याबाबत चुकीचे होत असल्याचा सूर उमटवला यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पोलिसांच्या विनवणीनंतर पवारांनी बदलला निर्णय
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो असे जेव्हा पोलिसांनी शरद पवारांना सांगितले, तेव्हा एकेकाळी मीही राज्याचा गृह खात्याचा प्रमुख राहिलेलो आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये आणि कायदा सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून मी ईडीकडे जाण्याचा निर्णय रद्द केला असल्याचे शरद पवारांनी सांगितले. मात्र यामुळे अनेक ठिकाणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर असलेली मरगळ निघून गेली आहे आणि कार्यकर्ते विधानसभेच्या जोरदार तयारीला लागल्याचे पहायला मिळत आहे.