कोकणात ‘हा’ नेता शिवसेनेतून राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अजून संपत नाही, तोच राज्यात विधानसभेची तयारी चालू झालेली दिसून येत आहे. अशातच कोकणात शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण कोकणातले शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे जवळचे सहकारी बबन साळगावकर हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेनेने कोकणात पुन्हा एकदा आपला जम बसविण्यास सुरुवात केली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर यांना शिवसेनेने आपल्याकडे खेचले. परंतु आता केसकरांचे समर्थक आणि सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे .

कोण आहेत बबन साळगावकर?

बबन साळगावकर हे सावंतवाडीचे तीन वेळा नगराध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे या भागात त्यांचा चांगला जनसंपर्क असल्याचं बोललं जातं. दीपक केसरकर यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून साळगावकर इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, आता दोन अत्यंत जवळचे मित्र एकमेकांसमोर उभे ठाकणार का हे पाहणे फार महत्वाचे ठरणार आहे.