नाराज एकनाथ खडसे भाजप सोडणार ? शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याने केलं भाष्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपमधील काही नेत्यांवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. भाजपमध्ये काही लोकांकडून सातत्याने अपमान होतोय. अपमान असाच सुरु राहिल्यास वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा खडसेंनी काल दिला होता.

तसेच त्यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनतर आता उद्या ते मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील भेटणार आहेत. विरोधक नेत्यांशी वाढत्या भेटीमुळे खडसे पक्षांतर करणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘राजकारणात कुणीही कुणालाही भेटू शकतं. कुणी कुणाला भेटावं यावर बंदी नाही. एकनाथ खडसे सर्वांचे मित्र आहेत. शिवसेना-भाजपची युती असताना त्यांनी अनेक नेत्यांसोबत एकत्र काम केलं आहे. गेल्या अनेक वर्षाचे स्नेहसंबध आहेत. त्यामुळे या भेटींचा वेगळा अर्थ काढू नये. लोकशाहीत कुणीही कुठेही जाऊ शकतो.’

खडसे भाजपमध्ये नाराज असून वेळोवेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. मागील 4 वर्षांपासून भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे पक्षात बंड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमधील नाराज नेत्यांच्या बैठकीचं सत्रही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. खडसे हे भाजप नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेल्याची चर्चा होती. पण, त्याऐवजी ते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like