शिवसेनेच्या नाराज आमदारांबद्दल एकनाथ शिंदेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या १७ आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी मातोश्री वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी खुलासा करत सांगितले की, आमचा कोणताही आमदार नाराज नाही. सगळे आमदार आधीपासून शिवसेनेसोबत आहेत आणि ते कायम राहणार. शिवसेनेचे १७ आमदार आघाडीसोबत जाण्यास नाराज असल्याची बातमी खोटी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा हा वाढतच असून अनेक नाटकीय घडामोडी सध्या पाहायला मिळत आहेत.

या सगळ्यांमध्ये शिवसेनेची चांगलीच गोची झाली असून सत्तास्थापनेपासून शिवसेनेची कोंडी झाली आहे. मुख्यमंत्री पदावरून हा सत्तापेच निर्माण झाला असून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अजूनही सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. अशातच शिवसेनेचे १७ आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या मुद्द्यावरून नाराज असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे.

विधानसभा निकालानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सलगी करून भाजपास सत्तेपासून दूर ठेवण्यास भाजपविरुद्ध लढाई छेडली होती. भाजप-शिवसेना हे दोन्ही पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतात. या तत्वांना धरून शिवसेनेतील काही आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्यास नाराजी व्यक्त केल्याचे चित्र दिसत होते. या नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी या १७ आमदारांना घेऊन मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. सध्या या नाराज आमदारांची समजूत काढली जात असल्याचे सूत्रांकडून समजते.

नाराज आमदार मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ?
शिवसेनेतील नाराज आमदार हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील आहेत. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हा विभाग राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या कारणावरून स्थानिक समीकरण लक्षात घेऊन आमदारांमध्ये मतभेद होताना दिसत आहेत का, असे असले तर आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता कितपत आहे, या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

Visit :  Policenama.com