गद्दारांच्या यादीत माझं नाव नाही, गुलाबराव पाटलांचा राणे पिता-पुत्रांना टोला

नगर : पोलीसनामा ऑनलाइन – मी भगव्याच्या धुंदीत आहे. तुम्ही तर भगवा सोडून पळाले, काँग्रेसमध्ये गेले, नंतर भाजपमध्ये आले. मी निष्ठावंत आहे. गद्दारांच्या यादीत माझे नाव नाही. त्यामुळे आधी आपण आपली औकात व निष्ठा कोठे आहे ती ओळखावी, नंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर टीका करावी, असा घणाघात शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केला आहे. ते नगरमध्ये बोलत होते.

नितेश राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. या टिकेला प्रत्युत्तर देताना पाटील यांनी राणेंवर तोफ डागली. गुलाबराव पाटील म्हणले, नारायण राणे हे ज्यावेळी शिवसेनेमध्ये होते, त्यावेळी आम्ही त्यांचे पाठिराखे होतो. हे त्यांचे पोट्टे तेव्हा बनियनवर असतील. आता त्यांनी मला शिकवू नये. मी 36 वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला धमक्या देऊ नयेत, असा सज्जड दम गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिला.

ते पुढे म्हणाले, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. राणे यांनी माझ्यावर टीका केली आहे की, गुलाबराव पाटील किती वेळा शुद्धीत असतात ? अरे मी एका धुंदीत असतो, ते म्हणजे भगव्याच्या. मी निष्ठावान आहे. गद्दारांच्या यादीत माझे नाव नाही, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. मी जेव्हा नितेश राणे यांच्या वडिलांच्या मागे उभा होतो. तेव्हा ते फाईटर बटालियनमध्ये माझे नाव घेत होते. आता नारायण राणेंना मी कसा काय वाईट वाटायला लागलोय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून नैराश्येमध्ये असलेल्या माणसाला काही उद्योग नसतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

सुशांत सिंह प्रकरणावरून नारायण राणे यांच्यावर निशाणा साधताना पाटील म्हणाले, नारायण राणे यांना ठाकरे कुटुंबाने मोठे केले. ठाकरे कुटुंबामुळे राणे यांचे नाव झाले. त्या ठाकरे कुटुंबावर तरी राणे यांना असले घाणेरडे आरोप करायला नकोत. कारण माणूस कोणत्या विचारात गेला, यापेक्षा तो कोणामुळे मोठा झाला हे त्यांनी बघायला पाहिजे होते. पण ज्याला मनाची नाही त्याला जनाची काय असणार, असे पाटील यांनी म्हटले आहे.