फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानं राजकारण तापलं, शिवसेनेच्या नेत्याची सडकून टीका

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राजस्थानमध्ये राजकीय उलथापालथ झाल्यानंतर राजस्थानमध्ये भाजपकडून काँग्रेसचे सरकार पडाण्याच्या हालचाली सुरु झाल्याचे बोलले जाऊ लागले आहे. त्यातच महाराष्ट्रातील आघाडी सरकारमधील नेत्यांकडून देखील भाजप राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आहेत. राजस्थानसारखा प्रयत्न महाराष्ट्रात होऊ शकतो असे बोलले जात आहे. त्यातच आज विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून चर्चांना उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता, त्यांनी मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं संख्याबळ कमी असल्याने भाजप सरकार पाडण्यात यशस्वी ठरलं. मात्र, राजस्थानमध्ये त्यांना जोरदार धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचं स्वप्न तर भाजपने सोडूनच द्यावे असा टोला त्यांनी लगावला आहे. पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडे 170 आमदारांचा पाठिंबा आहे. आमदार काय बैल जोडी आहे का कोणीही पळवून नेईल ? असा खोचक सवाल त्यांनी केला.

दरम्यान, ठाकरे सरकार पाडण्यात आम्हाला काहीही स्वारस्य नाही. हे सरकार तीन पक्षांच्या अंतर्विरोधाने कोसळणार आहे. जेव्हा हे सरकार कोसळेल तेव्हा काय करायचं ते पाहू. आज मी अमित शाह यांना भेटलो यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता. कोरोनाची महाराष्ट्रातील स्थिती आणि शेतकऱ्यांची परिस्थिती या दोन गोष्टीं बाबत मी त्यांच्याशी बोललो, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.