युती अन् राष्ट्रवादीशी कधीच होऊ शकत नाही, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचं उध्दव ठाकरेंनाच ‘आव्हान’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील राजकारणाचे समीकरण काहीही असले तरी बीड जिल्हा पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसशी आम्ही कधीही जुळवून घेऊ शकत नाही. जिथे राष्ट्रवादीचे आमदार चुकतील तिथे उघड उघड विरोध केला जाईल, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी घेतली आहे.

विधानसभेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. शिवसेनेने भाजपपासून दूर होत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जात राज्यात सरकार स्थापन केले. मात्र असे असले तरी स्थानिक पातळीवर हे दोन्ही पक्ष एकत्र आले नसल्याचे पहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर कुरघोडीचे राजकारण सुरु असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे आमदार हे आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत. जे कामे सुरु आहेत त्या ठिकाणी लक्ष घालत आहेत, असा आरोप कुंडलिक खांडे यांनी राष्ट्रवादीवर केला आहे. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर उपस्थित होते.

बीड शहरातील के. एस. के. महाविद्यालयाच्या सभागृहात निवडणुकीच्या पराभवानंतर आज कर्यकर्ता संवाद व चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खांडे बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. आमचं सगळं आलबेल आहे असा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीसमोर स्थानिक कार्यकर्ते आणि नेते यांच्यात समन्वय साधण्याचे आव्हान असणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवर हे दोन्ही पक्ष एममेकांच्या विरोधात असून उघड उघड विरोध आणि नाराजी जाहीर करत आहेत.