अखेर यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले ! मुख्यमंत्र्यांनी सोपवली संदीपान भुमरे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आता राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्य शासनाने शुक्रवारी (दि. 16) या संदर्भात आदेश काढला आहे. कोरोनाच्या संकटात जिल्ह्यातील इतर अनेक मुलभूत प्रश्न मागे पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची विस्कटलेली घडी जागेवर आणण्याचे आव्हान नवीन पालकमंत्री भुमरे हे कशा पद्धतीने स्वीकारतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मंत्री संदीपान भुमरे हे यवतमाळ जिल्ह्यातील कोविड परिस्थिती, शिवसेनेच्या दोन गटात विभागलेले राजकारण, महाविकास सरकारमधील घटक असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीसोबतचे संबंध या सर्व गोष्टींना कसे सामोरे जातील, याबाबत जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. जिल्ह्यात सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. दररोज सरासरी 20 वर रूग्णांचा मृत्यू होत असून एक हजारांवर बाधित होत आहे. सध्या जिल्ह्यात 5 हजार सक्रिय करोनाबाधित आहेत. रूग्णांना शासकीय, खासगी दवाखान्यात जागा मिळत नाही. रेमडेसिवीर इंजेक्शनसह ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार असलेले संदीपान भुमरे यांच्या नियुक्तीने स्थानिक शिवसेना नेतृत्वासही धक्का बसला आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेचे सत्ताकेंद्र 2 ठिकाणी विभागणार तर नाही ना, अशी शंका शिवसैनिकांमध्ये व्यक्त होत आहे.