सरकारी यंत्रणेचा वापर करून भाजपनं ‘फोडाफोडी’चं राजकारण केलं, शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, राष्ट्रपती राजवट अशा धमक्या दिल्या जात आहेत. मात्र, आता महाराष्ट्रातील कुठल्याही पक्षाचा आमदार फुटणार नाही. सरकारी यंत्रणांचा वापर करून फोडाफोडीचे राजकारण यांनी केले, असा आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्यातील जनतेने विरोधात बंड केले आणि निकालाचे आकडे बदलले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार तरी येतील का असे वातावरण असताना त्यांचे मागील वेळेपेक्षा अधिक आमदार निवडून आले. विशेषत: शरद पवारांबाबत ईडीची नोटीस प्रकरण घडायला नको होते. असेही ते म्हणाले. दरम्यान हीच ती वेळ, आता नाही तर कधी नाही असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे सांगितले.

संजय राऊत म्हणाले, तरुणांनी नेतृत्त्व केलं पाहिजे असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. मात्र, मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा उद्धव ठाकरे हेच घेतील असेही त्यांनी सांगितले. आम्ही स्वबळावर लढू असे आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितले होते. आम्ही 288 जागा लढण्याची तयारी केली होती. मात्र, भाजपला असे वाटले की शिवसेना सोबत नसेल तर आपण महाराष्ट्रात पाराभूत होऊ यासाठी अमित शहा हे स्वत: युतीचा प्रस्ताव घेऊन आले.

भाजपाशिवाय सरकार स्थापन करणार
विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढं आला आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्याची पहिली संधी त्यांनाच आहे. जर भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करता आले नाही, तर शिवसेना सरकार स्थापन करेल. शिवसेना सत्तेपासून केवळ एक पाऊल दूर असून, आमच्याकडे शिवसेनेला पाठिंबा देणारी पत्र आहेत, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Visit : Policenama.com