संजय राऊत-हर्षवर्धन पाटील यांच्या गळा भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

इंदापूर : पोलिसनामा ऑनलाईन – अकोला येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्त आलेले शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची गळाभेट झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान राजकीय उलथापालथ होणार अशी चर्चा सुरु होताच हर्षवर्धन पाटील यांनी स्वतः तालुक्यात आलेल्या पाहुण्यांची गळाभेट घेऊन स्वागत करणे ही परंपरा असल्याचे सांगत या गळाभेटीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली होती. यात त्यांचा पराभव झाला होता. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका तसेच सरपंच उपसरपंच निवडी यांमुळे इंदापूरमधील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच रविवारी अकोला (ता.इंदापूर) येथे खासदार संजय राऊत एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले होते. या निमित्ताने पाटील आणि राऊत या दोघांची गळाभेट झाल्याने लोकांमध्ये राजकीय उलथापालथ होतेय की काय अशी चर्चा लोकांमध्ये रंगू लागली आहे. या भेटीवर हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्टीकरण दिल. ते म्हणाले, तालुक्यात आलेल्या पाहुण्यांची गळाभेट घेऊन स्वागत करणे ही परंपरा आहे. या भेटीमध्ये कोणताही राजकीय उद्देश नसून सध्या सुरु असलेल्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही असेही ते म्हणाले.

….तर लॉकडॉउन लावावा लागेल
खासदार संजय राऊत यांनीही या भेटीवर भाष्य केलं आहे. आमचे मैत्रीचे संबंध असल्याने गळाभेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना रोगाचे संकट राज्यात वाढत असून याला अटकाव करण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही तर सर्व नागरिकांची पण आहे. ग्रामीण भागात लोक शिस्त पाळताना दिसत नाही. जर रुग्णांची संख्या वेगाने वाढली तर प्रशासनाला पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल असे संकेत राऊत यांनी यावेळी दिले.