मनसेच्या हिंदुत्वाच्या मुद्यानंतर आता संजय राऊतांची मोठी घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना पक्ष ज्वलंत हिंदुत्त्वाचा पुरस्कार करत आली आहे. मात्र, आगामी काळात हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि मनसेमध्ये चांगलाच सामना रंगणार असल्याचं दिसून येत आहे. कारण मराठीचा मुद्दा अजेंड्यावर ठेवणाऱ्या राज ठाकरे यांनीही आता आपला मोर्चा हिंदुत्त्वाकडे वळवला आहे. त्यात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यामुळे पुन्हा एकदा या दोन पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरु राहणार असल्याचे बोलले जात आहे.

त्यात शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सांगितले कि, ‘राम मंदिराचा मुद्दा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत रामजन्मभूमीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. तसंच शरयू नदीची आरतीही करणार आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी सर्व देशाचं लक्ष शिवसेनेच्या या दौऱ्याने वेधून घेतलं होतं.

त्यानंतर लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर विजयी खासदाराना घेऊन उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येत राम दर्शनासाठी गेले होते. त्यांनतर आता शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री झाल्यावर तिसऱ्यांदा अयोध्येत राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे जरी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महविकास आघाडी करत सत्ता स्थापन केली असली तरी शिवसेनेनं आक्रमक हिंदुत्व सोडलेलं नाही, हे दाखवण्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा अयोध्येत दौरा करणार असल्याची चर्चा केली जात आहे.

वार आणि पलटवार :

शिवसेनेनं राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेचा समाचार घेत म्हंटले कि, ‘मनसेप्रमुखांना त्यांचे मुद्दे मांडण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्यांनी आज घेतलेल्या भूमिका व त्याच विषयावर पंधरा दिवसांपूर्वी मांडलेली मते मेळ खात नाहीत. भाजपची शिवसेनाद्वेषाची मूळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे व हे त्यांचे खेळ जुनेच आहेत, असा टोला लगावला.

शिवसेनेच्या या वक्तव्यांनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर प्रत्यारोप करत म्हंटले कि, ‘आधुनिक अफजल खानानी मराठी आणि हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. नेमकं त्याच गोष्टीवर राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर पडत्यात. काळजी करू नका आम्हीच उपचार करू,’ अश्या शब्दात संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली.

फेसबुक पेज लाईक करा –