अयोध्येला जाण्यासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रणाची गरज नाही, शिवसेनेचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख केंद्र सरकारकडून निश्चित झाल्यानंतर आता सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. भूमिपूजन सोहळ्यला केवळ 100 जणांना निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले नाही. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टोला लागवाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. अयोध्येला जाण्याचा रस्ता शिवसेनेनेच तयार केला असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

येत्या 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी निवडक 100 मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांना विचारले असता त्यांनी आपल्या खास शैलीत भाजपला टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. अयोध्येचा रस्ता शिवसेनेने तयार केला आहे. अयोध्येच्या रस्त्यातील सर्व अडथळे शिवसेनेने दूर केले आहेत, असे राऊत यांनी म्हटले आहे.

अयोध्या आणि शिवसेनेचं नातं अतूट आणि कायम आहे. हे काही राजकीय नातं नाही. राजकारणासाठी आम्ही कधी अयोध्येला जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अयोध्येला जाण्याचं निमंत्रण मिळालं आहे. चांगली गोष्ट आहे. त्या निमित्तानं का होईना ते अयोध्येला जातील. आम्ही अयोध्येत नेहमी जातो, असा चिमटा देखील त्यांनी यावेळी काढला.