वळसे पाटील-आढळराव पाटील हे येणार एकत्र !

मंचर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी करुन राज्यात सरकार स्थापन केले. राज्यात सत्तेतील हे पक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढताना पहायला मिळत असताना मात्र पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये वेगळे चित्र पहायला मिळत आहे. मंचर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकमेकांचे विरोधक असलेले वळसे पाटील आणि आढळराव पाटील हे एकत्र येणार आहेत.

मंचर ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि स्व. माजी खासदार किसनराव बाणखेले गट यांनी एकत्रितपणे महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मागील अनेक वर्षापासून एकमेकांचे विरोधक असलेले वळसे-पाटील आणि आढळराव पाटील हे यानिमित्ताने एकत्र येणार आहेत. मंचरमध्ये काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने या निवडणुकीत तिहेरी लढत होणार आहे.

महाविकास आघाडीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, शिवसेनेचे मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी केली. यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, बाळासाहेब बाणखेले, शिवसेनेचे नेते राजाराम बाणखेले, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, बणखेले गटाचे नेते जे.के. थोरात उपस्थित होते.

देवेंद्र शहा म्हणाले, मंचर नगरपंचायत करण्याची प्रक्रिया मंत्रालयस्तरावरुन सुरु आहे. कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नामुळे नगरपंचायत होण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. त्यानुसार आघाडीचा धर्म पाळला जात आहे.आंबेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष राजू इनामदार यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाला अपेक्षेप्रमाणे जागा न मिळाल्यामुळे आणि या संदर्भात महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून काँग्रेसच्या अधिकृत व्यक्तीशी चर्चा न केल्याने मंचरमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीशी काँग्रेस सहमत नाही.