‘भाजप आणि आमचं लव्ह मॅरेज होते, 36 वर्षाच्या शिवसेनेच्या प्रवासात पहिल्यांदा घड्याळाला मतं मागायची संधी मिळाली’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन  –    पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचाराची मुदत 15 एप्रिलपर्यंत असल्याने प्रचार अंतिम टप्प्यात शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे प्राचारसभा, प्रचारफेरी, घर टू घर भेटींना वेग आला आहे. प्रचारानिमित्ताने एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. आज शिवसेनेचे नेते पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचार सभेत जोरदार फटकेबाजी करत आपल्या शैलीत भाजप नेत्यांचा समाचार घेतला. 36 वर्षाच्या शिवसेनेच्या राजकीय प्रवासात पहिल्यांदा घड्याळाला मत मागायची संधी मिळाल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

मी संत नाही पण चेहरे ओळखतो

गुलाबराव पाटील म्हणाले, 36 वर्षाच्या शिवसेनेतील राजकीय प्रवासात पहिल्यांदा घड्याळाला मत मगाण्याची संधी मिळाली असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी भाजप आणि आमचं लव्ह मॅरेज होते, असे देखील सांगितले. मी जादूगार नाही संत नाही पण चेहरे चांगले ओळखतो असे पाटील म्हणाले. गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या खास स्टाईलमध्ये म्हणाले खा त्यांचं मटण आणि दाबा आमचं बटन, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.

फडणवीस यांच्यावर निशाणा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरची जागा निवडून द्या, सरकार बदलतो, असे वक्तव्य केले होते. फडणवीस यांच्या वक्तव्याचा गुलाबराव पाटील यांनी शेरोशायरीत चांगलाच समाचार घेतला. शिवसेनेने आमच्या सारख्या लहान लहान लोकांना मोठं केलं. येत्या काळात मंगळवेढा टँकरमुक्त करणार असल्याचे आश्वासन गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले. तुमची देण्याची ताकद आहे आमची घेण्याची आहे. ज्याच्या घरी जास्त चप्पल जोडे येतात तो खरा श्रीमंत असतो, असेही पाटील म्हणाले.