पवारांच्या दौऱ्यात चोरी, शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची चार तोळ्याची सोनसाखळी चोरीला

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन राज्याच्या विविध भागात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र पवारांच्या या दौऱ्यात चोरट्यांचा सुळसुळाट दिसून आला. उमरगा तालुक्याचे शिवसेनचे आमदार ज्ञानराज चौघुले यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली.

आमदारांचीच सोनसाखळी लंपास झाल्याने सर्वत्र एकच धांदल उडाली. सोनसाखली चोरीला गेल्यानंतर आमदार चौगुले यांनी याप्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दिलेली नाहीये. मात्र झाल्या प्रकाराने यंत्रणेची चांगलीच धापवळ उडाली. खुद्द आमदार साहेबांचीच सोनसाखळी लंपास झाल्यानंतर पोलिस सतर्क झाले आहेत.

आज तुळजापूरमधून शरद पवार यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यात शरद पवार यांच्याबरोबर लोकप्रतिनिधी अधिकारी देखील आहेत. उमरगा तालुक्याचे शिवसेना आमदार चौघुले देखील पवारांसोबत आहेत. चौगुले यांच्या गळ्यात 4 तोळे वजनाची 2 लाख रुपये किंमतीची सोनसाखळी होती. मात्र गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने आमदार चौगुलेंच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केली.

शरद पवार यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अतिवृष्टीमुळं झालेलं नुकसान मोठं आहे. या संकटावर एकत्रितरित्या मात करायला हवी. आपण भूकंपासारख्या संकटाला तोंड दिलं आहे, त्यामुळं धीर धरा, अशा शब्दात पवारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.

बळीराजांनी मांडल्या व्यथा
शरद पवार यांनी आज तुळजापूरमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यानंतर काकांब्रा, लोहारा, सास्तुरा या गावांचा दौरा करत शरद पवार मार्गक्रमण करत आहेत. या गावांना भेटी देताना शरद पवार यांनी रस्त्यात अनेक ठिकाणी गाडी थांबवून शेतकऱ्यांची विचारपूस केली. तेव्हा लोहारातील शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. या शेतकऱ्यांच्या हातात पावसात भिजल्यामुळे वाया गेलेली पिके होती. ही पिके शेतकऱ्यांनी शरद पवार यांना दाखवली. आम्ही दुबार पेरणी केली, पण पावसामुळे ती वाया गेली. त्यामुळे आता किमान पुढील पेरणीआधी पंचनामे होऊन आम्हाला आर्थिक मदत द्या, असे शेतकऱ्यांनी शरद पवार यांना सांगितले.