शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा फडणवीसांवर पलटवार, म्हणाले – ‘लेडीज बारमध्ये डान्स करणारे…’

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन –   शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर शिवसेना- आणि भाजपात चांगलाच कलगीतूरा रंगला आहे. संजय गायकवाडांची रात्री घेतलेली उतरली नसेल आणि सकाळी बाईट दिला, या फडणवीस यांनी केलेल्या टीकेला पुन्हा एकदा आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लेडीज बारमध्ये डान्स करणारे लोक फडणवीसांचे सहकारी मंत्री होते. बुलडाण्याचे पालकमंत्री होते असा पलटवार गायकवाड यांनी केला आहे. तसेच नारायण राणे, नितेश राणे यांच्यासारखे भाजपाचे काही लोक मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. तुम्ही आमच्या नेत्यांवर टीका करायची मग आम्ही तुमची पूजा करायची का? असा सवाल आमदार गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

आमदार गायकवाड म्हणाले की, मी मीडियाला कधी बाईट दिला याची माहिती त्यांना नसेल. मी संध्याकाळी 5 वाजता बोललो होतो. त्यावेळी सकाळ नव्हती. तळीराम पाळायची सवय त्यांना आहे. मी जे बोललो त्यावर ठाम असल्याचे गायकवाड म्हणाले. कोरोनावरून जे राजकारण सुरू आहे. त्यावर मी माझी भूमिका मांडली. लोकांचे जीव वाचले पाहिजेत, असे मला वाटते. आम्हाला सल्ले देण्याआधी फडणवीसांनी केंद्राला सल्ला देऊन राज्याला मदत करायला सांगावी. फुकटचे सल्ले द्यायची गरज नाही. आमच्या आरोग्याची काळजी आम्हाला घेता येते. जे सल्ले उद्धवसाहेब आम्हाला देतात ते आम्ही ऐकतो असा टोला गायकवाड यांनी फडणवीसांना लगावला आहे.