शिवसेना आमदारांचे धक्कादायक विधान, म्हणाले – ‘… तर फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचा जंतू कोंबला असता’

बुलढाणाः पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या संकट काळात केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार सहकार्य करण्याऐवजी उलट कोंडी करत आहे. तर महाराष्ट्रातील भाजपाची मंडळी खिल्ली उडवीत आहे. भाजपच्या नेत्यांचे नीच राजकारण उभा महाराष्ट्र पाहत आहे. मला जर शक्य असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबले असते, इतका तिरस्कार या लोकांबद्दल माझ्या मनात निर्माण झाल्याचे धक्कादायक विधान बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. या लोकानी राजकारण न करता महाराष्ट्राला मदत करावी. अरे माणूस जगला पाहिजे. नंतर तुमचे राजकारण करा. माणसे मरत असतील तर तुम्हाला मतदान कोण करणार असा सवालही गायकवाड यांनी केला आहे.

आमदार गायकवाड म्हणाले, कोरोना हा कुण्या एका पक्षाच्या व्यक्तीला होतो असे नाही. तो प्रत्येक जाती-धर्माच्या माणसाला विळखा घालत आहे. भाजपाने हे विसरू नये की, येथील जनतेने त्यांच्या 105 आमदारांना मतदान केले आहे. त्यांचे 20 खासदार देखील महाराष्ट्रातील जनतेने निवडून दिले आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला इंजेक्शनचा पुरवठा करू नये असे सांगितले जात आहे. केंद्राकडे ऑक्सिजनची मागणी केली तरी दिली जात नाहीत. 50 हजार इंजेक्शन भाजपा कार्यालयातून गुजरातला फुकट दिली जात आहेत. राज्यात लोक तडफडत असतानाही इंजेक्शन, ऑक्सिजनचा पुरवठा केला जात नाही. आज त्यांना बांग्लादेश, पाकिस्तान, नेपाळ आदी राष्ट्रांना द्यायला इंजेक्शन, वॅक्सिन आहे. मग महाराष्ट्राला द्यायला यांच्याकडे इंजेक्शन, ऑक्सिजन नाही. अशा प्रकारचे गलिच्छ आणि नीच राजकारण भाजपा करत आहे. राज्यातील सर्व मंत्री जीव तोडून नियोजन करत आहेत. त्यांना मदत करायची सोडून त्यांची खिल्ली उडवली जात असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.