2024 च्या निवडणुकीला उभे राहाच, नारायण राणेंना शिवसेनेचे खुले ‘आव्हान’

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – कोकणातील शिवसेनेच्या 11 आमदारांना घरी बसवून शिवसेनेला कोकणातून हद्दपार करण्याची घोषणा करणारे भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांना ( MP Narayan Rane) शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Shivsena MLA Vaibhav Naik ) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 2019 च्या निवडणुकीतून पळ काढणाऱ्या राणेंनी येत्या 2024 च्या निवडणूक रिंगणात (2024-elections) उतरावे. शिवसेना काय आहे तुम्हाला कळेलच, असे थेट आव्हानच नाईक यांनी राणे यांना दिले आहे.

नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे 11 आमदार निवडून येणार नाही, असे आव्हान केले होते. ते आव्हान शिवसेनेने 2014 स्वीकारले आणि 2014 ला राणेंचे आव्हान मोडूनही काढले. विधानसभेतही त्यांचा पराभव माझ्यासारख्या शिवसैनिकांनी केलाच. पण त्यानंतर त्यांचा मुलाचाही दोन वेळा सलग पराभव शिवसेना आणि कोकणातील जनतेने केला आहे, असा टोलाही नाईक यांनी लगावला.

नारायण राणेंना माहिती असेल जर गेल्यावेळी राणेंचा मुलगा भाजपमध्ये गेला नसता तर तोही पराभूत झाला असता. खरेतर राणे जेव्हा आव्हान करतात, त्या त्या वेळी ते स्वत: त्यातून पळ काढतात. राणेंनी शिवसेना संपवण्याचे असे म्हटले होते. पण आता दुप्पट वेगाने शिवसेना वाढत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाल्याचे नाईक म्हणाले. त्यामुळे राणेंना आमचे आव्हान आहे 2024 मध्ये तुम्ही निवडणुकीला रिंगणात उतरावे आणि त्यावेळी शिवसेनेचे 11 आमदार येतात की 21 आमदार निवडून येतात हे तुम्हाला समजेल. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत तुम्ही निवडणुकीला उभे राहाच, असे खुले आव्हान शिवसेनेच्यावतीने करतो, असेही नाईक म्हणाले.

नारायण राणे काय म्हणाले होते ?
आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अकराही आमदार निवडून येणार नाहीत. सर्वांना घरी बसवण्यात येणार असून कोकणातून शिवसेना हद्दपार करण्यात येईल, अशी गर्जनाच खासदार नारायण राणे यांनी केली होती. त्यामुळे आता 56 आमदार घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेची संख्या कमी होईल, असा दावाही राणे यांनी केला होता. शिवसेनेचे 145 आमदार निवडून आलेले नाहीत आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यामुळे तुमचे आमदार किती असे त्यांना लोक विचारतील. त्यामुळेच ते पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली होती.