नारायण राणेंचं आत्मचरित्र फक्त प्रसिद्धीसाठी ; शिवसेना आमदार वैभव नाईकांचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मंत्री नारायण राणे यांचे आत्मचरित्र लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. या आत्मचरित्राचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पण या आत्मचरित्राच्या प्रकाशनापूर्वीच त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या आत्मचरित्रातून अनेक गुपित उघडकीस येतील असे संकेत नारायण राणे यांनी दिले आहेत. त्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर आता सिंधुदुर्गमधील शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी देखील नारायण राणेंवर उलट प्रश्न केले आहेत.

स्वतःवर झालेल्या आरोपांचे काय ?

याबाबत बोलताना वैभव नाईक म्हणले ,” नारायण राणेंचं आत्मचरित्र हे केवळ दुसऱ्यांवर आरोप करण्यासाठी आहे. मात्र स्वत:वर झालेल्या आरोपाचं काय? त्याचं स्पष्टीकरण आत्मचरित्रात का नाही? असा सवाल आमदार वैभव नाईकांनी विचारला आहे. श्रीधर नाईक हत्या प्रकरण, चेंबूरमधील गुन्हे, कोकणातील गुन्हे यावर राणेंनी आत्मचरित्रात स्पष्टीकरण का नाही दिलं? अशी विचारणा वैभव नाईक यांनी केली.

राणेंचे आत्मचरित्र फक्त प्रसिद्धीसाठी

नारायण राणेंच आत्मचरित्र हे फक्त प्रसिद्धीसाठी आहे. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करून काही फायदा नाही. उद्धव ठाकरेंचे नेतृत्व सक्षम आहे. नारायण राणे पक्षातून गेल्यावर कोकणातून जास्त आमदार निवडूण आले होते, याची आठवण वैभव नाईकांनी करुन दिली.

नारायण राणेंच्या आरोपात तथ्य नाही : मनोहर जोशी

याबाबत बोलताना जोशी म्हणाले, ‘ नारायण राणेंनी आपल्या आत्मचरित्रात बाळासाहेबांनी फोन करून बोलावणं आणि उद्धव ठाकरेंनी दिलेली धमकी या आरोपात तथ्य नसून या गोष्टी मी पहिल्यांदाच ऐकत असल्याचे शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी सांगितले. मनोहर जोशींच्या वागणुकीमुळे शिवसेनेवर आज वाईट अवस्था आलीय आहे असे आरोप राणेंनी केले होते मात्र यावर ‘ चांगलं शिक्षण महत्वाचं आहे, काही लोकं शिक्षित नाही ‘ असा टोला जोशींनी राणेंना लगावला आहे.