शिवसेना खा. ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्ला करणारा आरोपी जेलमधून फरार

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना खासदार ओमराजे निंबालकर यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर सबजेलमधुन फरार झाल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी पुन्हा आर.पी कॉलेजच्या पाठीमागील एका तात्पुरत्या सबजेलमध्ये त्याला नेण्यात आले होते. पण पोलिसांना गुंगारा देऊन तो पळून गेला आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर 16 ऑक्टोबर 2019 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे हल्ला झाला होता. त्यानंतर आरोपी अजिंक्य टेकाळे याला अटक करण्यात आली होती. गेल्या 10 महिन्यापासून तो जेलमध्ये होता. सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उस्मानाबाद शहरातील तांबरी भागात तात्पुरते कारागृह उभारण्यात आले आहे. त्यात आरोपी अजिंक्य टेकाळे याला ठेवण्यात आले होते.

वैद्यकीय तपासणीसाठी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले होते. त्या ठिकाणाहून जेलमध्ये परतल्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहे. ओमराजे हे कळंब येथे प्रचारासाठी आले असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. हल्लेखोराने हल्ला केल्यानंतर त्यांनी हातावर वार झेलल्याने ते जखमी झाले होते. खासदारावर हल्ला झाल्याने राज्यात खळबळ उडाली होती.