भाजपानं देशव्यापी आंदोलनाची हाक दिल्यानंतर शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी संतापल्या, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भाजपला पराभवाचा मोठा धक्का दिला. देशभरातून ममता बॅनर्जी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना दुसरीकडे तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार उफाळून आला. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. बंगालमध्ये झालेला हिंसाचार तृणमूल काँग्रेसमुळे झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. बंगालमधील व्हिडीओ शेअर करत राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी भाजप नेते आणि समर्थकांकडून करण्यात येत आहे. तसेच 5 मे रोजी भाजपने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार प्रयंका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त करत भाजपला टोला लगावला आहे.
पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु असून भाजपसहित इतर पक्षांनी तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. हिंसाचाराविरोधात भाजपने देशव्यापी धरणे आंदोलनाची घोषणा करुन 5 मे रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. हिंसाचारासंबंधी केंद्रीय गृहमंत्रालयाने सविस्तर अहवाल मागवला आहे. 5 मे रोजी होणारे देशव्यापी आंदोलन कोरोनाचे नियम पाळून केले जाईल असे भाजपच्या वतीने जाहिर करण्यात आले आहे.
भाजपच्या देशव्यापी आंदोलनाच्या घोषणेनंतर शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करुन भाजपवर निशाणा साधला आहे. देशाने अजून कोरोनाचा मोठा फैलाव पाहिलेला नाही. त्यामुळे भाजपनुसार अशा सुपर स्प्रेड धरणे कार्यक्रमांची गरज आहे. नाही का ? असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, हिंसाचारात मृत्यू झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा 4 आणि 5 मे रोजी पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. मतमोजणीच्या दिवशी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हुगली जिल्ह्यात पक्ष कार्यालयाला आग लावली शिवाय ममता बॅनर्जी यांचा पराभव करणारे सुवेंदू अधिकारी यांच्या वाहनावर हल्ला केला, असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांना तृणमूलच्या समर्थकांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप देखील भाजपने केला आहे. मात्र तृणमूल काँग्रेसने भाजपने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी राज्यात सुरु असलेल्या हिंसाचार प्रकरणी डीजीपींना समन्स बजावलं असून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
Yes we need super spreader dharna events across the nation, because clearly,as per the BJP, the country hasn’t seen enough of a COVID surge, no? https://t.co/knFyS19Ehb
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) May 3, 2021