IFSC मुंबईबाहेर गेल्यास केंद्राला जाणारा कर रोखला जाईल, शिवसेनेच्या ‘या’ खासदाराचा मोदी सरकारला ‘इशारा’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्र्र दिनी मुंबई मधील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गुजरातमधील गांधीनगरला हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजपात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहे. केंद्र सरकारने मुंबईच्या आकसापोटी व गुजरातवरील प्रेमापोटी मूळ निर्णयात फेरफार करून IFSC केंद्र गांधीनगरला हलविण्याचा निर्णय घेतलेला आक्षेपार्ह आहे. IFSC केंद्र मुंबई बाहेर गेल्यास मुंबईतून केंद्राला जाणारा कर रोखला जाईल, असा इशारा शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारला दिला आहे. तसेच केंद्र सरकारला या अन्यायकारक निर्णयाची मोठी किंमत चुकवावी लागेल, असं आव्हानही राहुल शेवाळे यांनी दिलं आहे.

मुंबई मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, शेअर बाजार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांसारख्या अनेक महत्वाच्या आर्थिक संस्था आहे. त्यामुळे जगभरातील आर्थिक घडामोडींचा ताळमेळ साधणारे IFSC केंद्र मुंबईतच असावे, असा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. त्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील जागा देखील निश्चित करण्यात आली होती. परंतु केंद्र सरकारने ही जागा मेट्रो रेल्वेसाठी आरक्षित करून IFSC मुंबईत उभारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रतिकूल परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप यापूर्वी राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केला होता.

तसंच दरवर्षी मुंबई केंद्राला करा द्वारे सुमारे पावणे दोन लाख कोटीं रुपये देते. देशभरातील ९० टक्के व्यापारी बँकिंग, ८० टक्के म्युच्युअल फंड ची नोंदणी मुंबईतून होते. या सर्व गोष्टींचा विचार करता IFSC मुंबई बाहेर नेल्यास, केंद्र सरकारला या अन्यायकारक निर्णयाची मोठी किंमत मोजावी लागणार आहे असं राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केलं. दरवर्षी एकट्या मुंबई कडून केंद्राकडे जमा होणार सुमारे ४० टक्के कर देखील गांधीनगर मधूनच वसूल करावा, असा सल्लाही खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारला दिला आहे.