‘दोनच काय, चार बायकाही सांभाळू शकतो’, शिवसेनेच्या ‘या’ खासदारानं दिलं राम शिंदेंना प्रत्युत्तर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – ज्या नवऱ्यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो, असं सडेतोड प्रत्युत्तर शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना दिलं आहे. दुध दरवाढीसाठी भाजपनं केलेल्या आंदोलनात भाजपचे नेते प्राध्यापक राम शिंदे यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली होती. राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रत्यक्षात तिघाडी सरकार आहे. एका नवऱ्याच्या दोन बायका अशी सरकारची अवस्था आहे. यांचा खेळ आवरत आलेला असून हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ता लागणार नाही, अशी घणाघाती टीका माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी आज केली.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दुधाला दरवाढ देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार लोखंडे हे एका कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राम शिंदे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. ज्या नवऱ्यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो. आमचे नेतेही या ताकदीचे आहेत, असे लोखंडे म्हणाले.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दूध दराच्या प्रश्नावरही आपली भूमिका मांडली, ते म्हणाले, दूध उत्पादक व्याकूळ झाले आहेत ही खरी गोष्ट आहे. दुग्धजन्य पदार्थांना मार्केट मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारनं व राज्य सरकारनेही निर्यातीला प्रोत्साहन म्हणून अनुदान दिलं पाहिजे, अशी खासदार म्हणून माझी भूमिका असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.