चव्हाण जे बोलतात त्याच्याशी मुख्यमंत्र्याचा थेट संबंध नाही : संजय राऊत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok chavan) जे बोलतात, सांगतात त्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा थेट काहीही संबंध येत नाही. हा विषय कॅबिनेटचा असून तो तिथेच सूटू शकतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यावर संजय राऊत (Sanjay raut) यांनी ही प्रतिक्रिया दिली.

राज्यातील नोकरभरतीवरुन इतर पक्षातील नेत्यांनी वातावरण खराब करू नये. हा विषय थोडाफार केंद्रांच्या अखत्यारित येतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. खासदार उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी नेतृत्व करावे, असेही राऊत म्हणाले.

चव्हाण काय म्हणाले होते?

काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला, असे वक्तव्य चव्हाण यांनी केले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चव्हाण परभणीत आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले होते. सत्तेत असताना आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, या मताचा मी आहे. पण दुर्दैवाने कोरोनामुळे 30 टक्केच निधी मिळाला, पण मराठवाड्याला अधिकचा निधी देण्याची माझी भूमिका असल्याची ग्वाही यावेळी चव्हाण यांनी दिली.