‘अयोध्या काही कुठल्या एका राजकीय पक्षाच्या सातबारावर लिहिलेली नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अयोध्येत राम जन्मभूमीत रामलल्लाच्या मंदिराचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भूमिपूजन सोहळ्यावरून भाजपवर टीका केली आहे. आजचा कार्यक्रम झाल्यावर आम्ही पुन्हा अयोध्येला जाणार आहोत. अयोध्या काही कुठल्या एका राजकीय पक्षाच्या सातबारावर लिहिलेली नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. यावेळी त्यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर जे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यावर परखड मत व्यक्त केलं आहे.

संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावताना म्हटले की, आज कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे लोकांची गर्दी टाळणे गरजेचे आहे. लोकांनी गर्दी करण्यापासून लांब रहावं. मुळात राम सगळ्यांचे आहेत. अयोध्या सर्वांची आहे. आजचा कार्यक्रम झाल्यावर आम्ही पुन्हा एकदा अयोध्येला जाणार आहोत. अयोध्या काही कुठल्या एका राजकीय पक्षाच्या सातबारावर लिहिलेली नाही. अयोध्या हे राष्ट्राच्या एकात्मतेचं प्रतिक असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच, आज राम मंदिराची पूजा होऊन जाऊ द्या. सगळं शांत होऊ द्या. मग ते आहेत आणि आम्ही आहोतच, असा इशाराही राऊत यांनी भाजपला दिला.

संजय राऊतांचा दावा
ज्या दिवशी बाबरीच्या घुमटावर शिवसैनिक असलेल्या कोठारी बंधूंनी हातोडे मारून तो उद्धवस्त केला. त्यावेळी इतर देखील प्रमुख पक्षांचे लोकं होते. ज्या दिवशी ती बाबरी पाडली त्याच दिवशी राम मंदिराचा पाया रचला गेला. बाळासाहेब ठाकरेंनी त्याचवेळी आशिर्वाद दिलेले आहेत. ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांना अयोध्येत पाऊल ठेवलं, तेव्हाच खऱ्या अर्थाने याला चालना मिळाली, असा दावा राऊत यांनी केला आहे.