‘डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका’; संजय राऊत यांचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बेळगावात मराठी माणसांवर सुरू असलेल्या दडपशाहीविरोधात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे. बेळगावात मराठी लोकांवर जो अत्याचार होत आहे, त्याची दखल कुणी घेत नसेल तर महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीनिशी बेळगावात उतरावं लागेल. परिस्थिती हाताबाहेर गेली तर महाराष्ट्र सरकार किंवा शिवसेनेला जबाबदार धरू नये. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांच्याकडून देण्यात आली आहे.

बेळगावात परिस्थिती चिघळत असेल तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार आहे. केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. केंद्र सरकारला पश्चिम बंगालमधला हिंसाचार दिसतो, त्यासंबंधी त्यांच्याकडून तक्रार करण्यात येते. बेळगावात मराठी नागरिकांवर, शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ले करण्यात येत आहेत. यामुळे तिकडची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं दिसून येत आहे. बेळगावात मराठी लोकांवर जो अत्याचार होत आहे, त्याची दखल कुणी घेत नसेल तर महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीनिशी बेळगावात उतरावे लागणार आहे. मी काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवेदने पाहिली आहेत. बेळगावला महाराष्ट्रात आणायचे ही त्यांची भूमिका आहे, पण सर्वांत आधी तिकडच्या मराठी नागरिकांना संरक्षणाची गरज आहे, असे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

मी बेळगावला जाऊ शकतो

बेळगावात सुरू असलेली दडपशाही ही कोणत्या एका राजकीय पक्षाचा किंवा सरकारचा विषय नाही. राज्यातून एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ तात्काळ बेळगावला पाठवायला हवे. जर असे झाले नाही तर सांगली कोल्हापूरमधील असंख्य नागरिक बेळगावमध्ये शिरतील. आणि जर तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली तर महाराष्ट्र सरकार किंवा शिवसेनेला जबाबदार धरले जाऊ नये. मी स्वतः बेळगावला जायचा प्रयत्न करतोय. मी बेळगावात जाऊ शकतो. तिथल्या असंख्य लोकांचे मला फोन येत आहेत. बेळगाव हा या देशाचा एक भाग आहे. आम्ही मराठी माणसे तिकडे जायचे म्हटले की, आम्हाला बंदुका दाखवतात. आमच्याकडे बंदुका नाहीत का? असेसुद्धा संजय राऊत म्हटले.

डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका

आम्ही कर्नाटकातील दडपशाही विरोधात आवाज उठवू. मात्र, त्यासाठी कठोर पावलं उचलायला आम्हाला भाग पाडलं तर ती पावलं सरकारी नसतील तर राजकीय असतील; मग डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका, असा इशाराच संजय राऊत यांनी कन्नडी उन्मादांना दिला आहे. कर्नाटक सरकारकडून बेळगावमध्ये अतिक्रमण करण्यात येत आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत काही काम करता येणार नाही. तिथे न्यायालयाचा अवमान करण्यात येत आहे.

महाराष्ट्र -कर्नाटक वाद चिघळला; दोन्ही राज्यांकडून एसटीची वाहतूक बंद

महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा चिघळला आहे. कर्नाटकमधील एका व्यक्तीने महाराष्ट्र एसटी बसवर दगडफेक केली. कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकारानंतर दोन्ही राज्यांकडून एसटीची वाहतूक बंद करण्यात आली आहे. कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या कारवर हल्ला केल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील वाद पुन्हा चिघळला आहे. यामध्ये बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काल जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर हल्ला केला आणि गाडीवरील झेंडा काढून कारची तोडफोड केली. त्यानंतर कोल्हापुरात शिवसैनिक अधिक आक्रमक झाले. त्यानंतर आक्रमक शिवसैनिकांकडून कोल्हापूर बस स्थानकावर आंदोलन करत कर्नाटक राज्याची बससेवा बंद करण्यात आली. तसेच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत कन्नड संघटनेच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिले आहे.

नेमकं काल काय घडलं होतं?

काल दुपारी बेळगावमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. काही कार्यकर्ते शिवसेनेच्या शाखेकडे जाण्यासाठी निघाले होते, त्यावेळी एकट्या शिवसैनिकाकडून कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांना विरोध करण्यात आला. या प्रकारानंतर मराठी भाषिकांकडून त्या ठिकाणी निदर्शनं करून कर्नाटक प्रशासन आणि कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.