8 पोलिसांचा ‘मारेकरी’ विकास दुबेच्या एन्काउंटरनंतर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  विकास दुबेला अटक झाली त्यानंतर आम्ही याच बातमीची वाट पहात होतो…जे झालं ते पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांचा बदला घेतला. याच क्षणाची वाट पहात होतो. त्याचं राजकारण नको करायला, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कुख्यात गुंड विकास दुबे याच्या एन्काउंटरवर भाष्य केलं आहे. मात्र, यावेळी त्यांनी एक आरोपही केला आहे.

विकास दुबे या सारखी माणसं तयार केली जातात. ती राजकारण्यांकडून निवडणुका जिंकण्यासाठी तयार केली जातात. खंडण्या गोळा करण्यासाठी… काही राज्यात हे सुरु आहे. विकास दुबे हा देखील राजकारणातच होता. गुन्हेगार राजकारणात येत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दुबेला पकडलं असतं तर त्याचे कुणाशी काय लागेबांधे आहेत हे समजलं असतं. ते खरं आहे. पण तो कसा पळाला, त्याला कोणी मदत केली, त्याचा कुणा कुणाशी संबंध होता, याची आताही चौकशी सुरुच राहील, असे सांगताना दुबे हा एकाकी मोठा झालेला नाही. त्याला एक पक्ष जबाबदार नाही. त्याला आपली राजकीय व्यवस्थाच कारणीभूत आहे. दुबेने यापूर्वीही मंत्र्यांवर हल्ले केले होते. तेव्हा योगी सरकार यूपीत नव्हते, असं सांगत राऊत यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारची पाठराखण केली.

उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यात गुंडांना सामाजिक प्रतिष्ठा मिळत आहे. इथल्या राजकारणातला तो दोष आहे. त्याला काही प्रमाणात पोलिसही जबाबदार आहेत. पण दुबे सारख्यांचा एन्काउंटर करणं योग्यच असतं. नाही तर पोलिसांची भीती कमी होऊन गुंडाराज येऊ शकते, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहेत. तसेच त्यांनी पोलिसांची पाठराखण करताना यूपी पोलिसांनी सूड घेतला असे म्हटले आहे.