‘मेट्रोशेड’च्या वादावर संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  ठाकरे सरकारने आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षाने यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता केंद्रानेही राज्य सरकारला कांजूर येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावरती ठाकरे सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संजय राऊत म्हणाले, हा विषय राज्य सरकार हाताळत आहे. यामुळे यावर तेच प्रतिक्रिया व्यक्त करतील. राज्य सरकार त्यावर योग्यपद्धतीने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वार्ताहरांनी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारले असता, त्यांनी या विषयाला बगल दिली. दरम्यान, सतत केंद्रातील मोदी सरकारवर टीका करणाऱ्या राऊत यांनी यासंदर्भात सावध भूमिका जाहीर करत प्रकरण चिघळणार नाही याची काळजी घेतल्याचे म्हटले जात आहे.

केंद्राचे मुख्य सचिवांना पत्र

सत्तेत आल्याच्या काही महिन्यांनंतर आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गाला हलवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. त्याला भाजपने विरोध दर्शवला होता. मात्र, आता या वादात केंद्र सरकारनेही उडी घेतली असून, कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत केंद्राने राज्य मुख्यसचिवांना एक पत्र पाठवले आहे.

“कांजूरमार्ग मधील जागा ही मिठागराची असून त्यावरचा हक्क अद्याप सोडलेला नाही. म्हणून ही जागा एमएमआरडीएला देण्याचा निर्णय रद्द करावा. त्याचसोबत कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम तत्काळ थांबावा,” असे या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, मुंबईचा विकास कसा रोखायचा यासाठी केंद्र सरकार नेहमी प्रयत्नशील असून, कांजूरमार्ग मेट्रो प्रकल्पाचे काम थांबण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत, अशी टीका मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी केली आहे.