Pooja Chavan Suicide Case : भाजप नेत्या चित्रा वाघ भडकल्या, म्हणाल्या – ‘सत्ताधारी तिन्ही पक्ष बलात्कारी व्यक्तीला वाचविण्याच्या प्रयत्नात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – “बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी सगळे मंत्री एकत्र आले. फक्त आपल्या खुर्च्या वाचवल्या आहेत, जनतेला काय उत्तर देणार ?” असं म्हणत चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं देखील म्हटलं आहे. यासोबतच पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांनी राष्ट्रीय महिला आयोग, राज्याचे पोलिस महासंचालकांना दिलेला चौकशी अहवाल हा वनमंत्री संजय राठोडच्या चौकशीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. हा अपूर्ण अहवाल सादर करुन पुणे पोलिसांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना टोपी घालण्याचे काम केले आहे. सत्तेत असणारे तिन्ही पक्ष बलात्कारी व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा पायंडा महाराष्ट्रसाठी घातक आहे,” असा आरोप भाजपच्या महिला प्रदेश उपाध्याक्ष चित्रा वाघ यांनी गुरुवारी केला. तसेच वानवडी पोलिस निरीक्षक दीपक लगड हा अधिकारी रगेल असून महाराष्ट्र पोलिस दलाला लागलेला कलंक आहेत, अशी टिकाही त्यांनी केली.

वाघ म्हणाल्या, ” पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड दोषी असून ते या आत्महत्यास जबाबदार आहे. 16 ते 17 दिवस मुंबईतुन केस आम्ही मॉनिटर करत होतो. घटना घडली तो फ्लॅट सील होता.तिने उडी मारली की तिला मारण्यास लावली याबाबत स्पष्टता नाही. वानवडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड हे ज्या पद्धतीने बोलत होते ते पाहता केस दाबण्याचा ते प्रयत्न करत आहे. पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केला नाही. पूजा सोबतचे राहणारे दोघे पोलीस ताब्यात नाही किंवा त्यांची चौकशी पुणे पोलिसांनी केली नाही. याप्रकरणी त्या दोघांची कस्टडी घ्यावी पोलिसांनी वाटले नाही, ते दोघे फरार आहे. पोलिसांनी या केस मध्ये काही करायचे नाही ठरवले आहे. मुंबई पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त संवेदनशील प्रकारे एखादे प्रकरण हाताळतात आणि वानवडी पोलीस निरीक्षक सांगतात आम्हला लेखी मुलीच्या पालकांची तक्रार नाही.”

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्येच्या घटनेनंतर १८ दिवसांनी वाघ यांनी गुरुवारी सकाळी १० वाजता घटना घडलेल्या वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीला भेट देऊन सदनिकेची पाहणी केली. तसेच त्यानंतर वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन राठोडसह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर आदी उपस्थित होते.