…म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून ‘अफू’ची पेरणी केली जातेय, शिवसेनेचा भाजपावर गंभीर आरोप

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारत-चीन सीमेमवर चीनने 20 जवानांची हत्या केल्याचा भयंकर प्रकार राज्यकर्ते क्षणात विसरतात. लोकांनीही ते विसरावे म्हणून वेगवेगळया माध्यमांतून ‘अफू’ पेरणी केली जाते. त्या अफू सेवनाने तात्पुरती धुंदी येत असेलही, पण प्रश्नांवरची जळमटे काही निघत नाहीत अशी टीका शिवसेनेने सामनातून केली आहे.

देशातील तरुणवर्ग धुंदीतून लवकरात लवकर बाहेर पडला तरच काही साधकबाधक विचार करता येईल. राजकारणासाठी मर्तिकही चालते, पण पोटापाण्याच्या प्रश्नांना स्पर्श करायला कोणी तयार नाही. भारतीय जनता पक्षासाठी सध्या मैदान साफ आहे. त्या मैदानात भुकेकंगाल बेरोजगारांचे थडगे उभारू नका. रिया चक्रवर्तीपासून कंगनापर्यंत सर्व महत्त्वाचे प्रश्न संपले आहेत. त्यामुळे राष्ट्राच्या लहानसहान, पोटापाण्याच्या प्रश्नांकडे पहा, अशी विनंतीच शिवसेनेने केली आहे. राजकारणाची खाज शमली असेल तर राजकारण्यांनी, मीडियाने आता देशापुढील गंभीर समस्यांकडे वळायला हरकत नाही.

सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी तपास करून सत्यशोधनास आलेल्या सीबीआयचा तपासही संपत नाही, पण रिया चक्रवर्तीस अमली पदार्थांच्या एका प्रकरणात मात्र अटक झाली आहे. ठरविल्याप्रमाणे कंगना राणावतही मुंबईस आल्या व मुंबई पोलिसांच्याच कडेकोट बंदोबस्तात स्वगृही पोहोचल्या. त्यामुळे आता राष्ट्रहिताच्या, राष्ट्रीय सुरक्षेच्या, जनतेच्या पोटापाण्याच्या प्रश्नांवर सगळयांनीच लक्ष द्यायला हवे, असे शिवसेनेने म्हटले आहे. भारत आणि चीनमध्ये सीमारेषेवर संघर्ष सुरू आहे. त्यावर मुंहतोड कारवाई करण्याचे आदेश कमांडर्सना देण्यात आले आहेत. चीन आमच्या हद्दीत घुसला आहे व इंचभरही मागे हटायला तयार नाही. हे लक्ष्मणरेषा तोडण्याचेच प्रयत्न नाहीत काय? मग आता आणखी कोणती लक्ष्मणरेषा तोडण्याची वाट आपण पाहत आहोत, अशी टीका शिवसेनेने केली आहे.