‘मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच, पण…’ : शिवसेनेचा सवाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच आहे. पण नोटबंदी आणि लॉकडाउन काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार? असा सवाल शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून विचारला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच्या दुसर्या कार्यकाळास एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

पंतप्रधान मोदी आजच्या काळातले सक्षम नेतृत्व असून त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत. त्यांना राष्ट्रकार्याची तळमळ आहे. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. अर्थात 60 वर्षात चुका झाल्या तशा मागच्या सहा वर्षातही झाल्या. गेल्या दोन महिन्यांत चुकीच्या पद्धतीने केलेले लॉक डाऊन व त्यानंतर स्थलांतरित मजुरांची ससेहोलपट ही फाळणीतील निर्वासितांचीच आठवण करून देणारी आहे. ही चूक कशी दुरुस्त करणार? अशीही विचारणा शिवसेनेने केली आहे.

मोदी सरकार साधारण सहा वर्ष सत्तेवर आहे. पूर्ण बहुमत असल्याने त्यांचे सरकार पांगुळगाड्याच्या आधारे चाललेले नाही, पण देशाचा मात्र अनेक बाबतीत पांगुळगाडा झाला आहे असा आरोप विरोधक करीत आहेत. मागील 70 वर्षांतील उणिवा मोदी सरकारच्या 6 वर्षांतील कार्यकाळात दूर झाल्या आहेत, असा दावा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे तर गृहमंत्री अमित शहा यांचे म्हणणे जरा वेगळे आहे. पंतप्रधान मोदी यांनी सहा दशकांतील ऐतिहासिक चुका दुरुस्त करण्याचे मोठे काम केले आहे असे शहा म्हणतात. कोरोना संकटकाळात मोदी हे पंतप्रधान आहेत हे भारत देशाचे भाग्यच म्हणावे लागेल असा बाण संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी मारला आहे. मोदी यांचा आत्मनिर्भर भारत नेमका कसा घडतो आहे ते या तीन प्रमुख नेत्यांच्या बोलण्यातून दिसते. एकंदरीत असे दिसते की, आपल्या महान देशाला फक्त सहा-सात वर्षांचाच इतिहास आहे. त्याआधी हा देश नव्हता. स्वातंत्र्य लढा नव्हता. त्यातील संघर्ष आणि बलिदाने हा फक्त आभास होता. देशातील सामाजिक, वैज्ञानिक, वैद्यकीय, औद्योगिक क्रांती वगैरे सगळे झूट आहे. साठ वर्षांत काहीच घडले नाही. महाराष्ट्रातला सह्याद्री पर्वत, हिमालय, कांचनजुंगा, गंगा-यमुना, कृष्णा-गोदावरी हे सर्व सहा वर्षांतच निर्माण झाले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग ही माणसे अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे त्यांच्या हातून जे कार्य घडले असे सांगितले जाते ते सर्व बोलबच्चनगिरीचे नमुने आहेत. असे संपादकीयमध्ये नमूद करण्यात आले आहे.