‘राज्यातील काही पुढारी जाहीरपणे कोरोनाची थट्टा करत आहेत’ – शिवसेनेकडून राज ठाकरेंवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दादरमध्ये मनसेने आयोजित केलेल्या मराठी स्वाक्षरी मोहिमेसाठी अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वाक्षरी मोहिमेच्या फलकावर राज यांनी स्वाक्षरी केल्यानंतर पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना राज ठाकरे यांनी उत्तरं दिली. यावेळी एका पत्रकाराने राज यांना तुम्ही मास्क घातलं नाही असं प्रश्न विचारला. यावर राज यांनी खोचक टकाक्ष टाकत, “मी घालत पण नाही,” असं उत्तर दिलं. तसेच पुढे त्यांनी, “मी तुम्हालाही सांगतो,” असं म्हणत तिथून निघून गेले.

कोरोना संकट पुन्हा एकदा नव्याने उभं राहण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन वारंवार मास्कचा वापर करा असं सांगत आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात हजेरी लावताना मास्क घातलेला नव्हता. यासंबंधी जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी आपण मास्क घालत नाही असं उत्तर दिलं. दरम्यान यावरुन शिवसेनेने अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, २०२० साली मे महिन्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. तिथेही राज यांनी मास्क न घालताच हजेरी लावली होती. राज यांच्या पाठोपाठ लगेचच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीसही मंत्रालयामध्ये दाखल झाले. फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर होते. या दोघांनाही नियमांचे पालन करत मास्क घातल्याचे चित्र दिसले. मात्र राज यांनी मास्क बंधनकारक असतानाही घातलं नव्हतं. याचसंदर्भात पत्रकारांनी नंतर प्रश्न विचारला असता राज यांनी, “सगळ्यांनी मास्क लावला आहे, म्हणून मी लावला नाही”, असं उत्तर दिलं होतं.

याचवेळी राज यांना परवानगी नसताना राज यांना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना राज यांनी, “बाकीच्या सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते, सरकारच्या कार्यक्रमाला गर्दी होते. सरकारमधील मंत्री सगळ्या कार्यक्रमांमध्ये धुडगूस घालू शकतात गर्दी करुन आणि शिवजयंतीला तुम्ही नकार देता. मराठी भाषा दिनाला नकार देता. एवढं कोरोनाचं संकट समोर येतंय असं वाटत असेल तर सगळ्या निवडणुका पुढे ढकला. जाहीर केल्या जाणाऱ्या सर्व निवडणुका पुढे ढकला,” अशी मागणी केली.