अयोध्येत कारसेवक भजन करण्यासाठी जमले नव्हते : शिवसेना

पोलिसनामा ऑनलाईन – अयोध्येतील बाबरी प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचे फार खळखळ न करता सर्वांनीच स्वागत करायला हवे. अयोध्या रामाचीच असा सुप्रीम कोर्टाचा आदेश येऊनही आणि राममंदिराचे काम सुरू होऊनही बाबरी पाडल्याचा खटला मात्र सुरूच राहिला. विशेष न्यायालयाच्या आदेशानंतर ही औपचारिकताही आता संपुष्टात आली आहे. असे मत शिवसेनेने सामना संपादकीयमधून व्यक्त केले आहे.

बाबरी पडली म्हणूनच तर राममंदिराच्या भूमिपूजनाचा सुदिन आपण पाहू शकलो. अन्यथा हे भूमिपूजन शक्य झाले असते काय? त्यामुळे उगाच जुनी थडगी उकरून माहोल खराब करण्यापेक्षा बाबरी प्रकरण फाइलबंद करण्याच्या न्यायालयाच्या निकालाचे सर्वांनीच स्वागत करायला हवे. तेच देशहिताचे आहे. न्यायमूर्तींप्रमाणेच बाबरी पाडल्याचा विषयही आता निवृत्त व्हायला हवा. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत जे घडले तो एक इतिहासच होता. त्या दिवशी अयोध्येत दीड लाख रामभक्त, कारसेवक जमले होते. ते केवळ भजन करण्यासाठी नक्कीच जमले नव्हते. ज्यासाठी ते आले ते काम पूर्ण करूनच ते निघाले. कारण प्रभू श्रीराम हे हिंदूधर्मीयांचे आराध्य दैवत आहे. अयोध्या ही तर श्रीरामांची जन्मभूमी. त्याच जन्मभूमीवर उभे असलेले मंदिर पाडून बाबरी मशीद बांधली गेली. कित्येक वर्षे खटला चालूनही हा विषय तसाच लोंबकळत पडल्याने शेवटी रामभक्तांनीच त्याचा निकाल लावला, असे शिवसेनेने म्हटले आहे.