‘बिहारमध्ये हिंदुत्वावर पोलिसांनी गोळ्या चालवल्यात हो !’, ‘त्याविरोधात कधी घंटा बडवणार ? निदान थाळ्या तरी वाजवा’ : शिवसेना

पाटना : वृत्त संस्था – बिहारमधील मुंगेरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरून शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये हिंदुत्वावर पोलिसांनी गोळ्या चालवल्यात हो असं सांगत त्याविरोधात कधी घंटा बडवणार ? निदान थाळ्या तरी वाजवा अशी उपहासात्मक टीका शिवसेनेनं केली आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीय मधून आपलं म्हणणं मांडलं आहे.

काय लिहलंय सामनाच्या अग्रलेखात ?

“महाराष्ट्रात मंदिरे उघडा असं घंटानाद करून सांगितलं जात आहे. मंदिरांचे टाळे तोडून आत जाऊ अशा धमक्या दिल्या जात आहेत. या मंडळींना मुंगेरचा हिंसाचार, हिंदुत्वाचा अवमान याबाबत काहीच देणं-घेणं पडलेलं दिसत नाही. सोयीचं हिंदुत्व हे असं असतं” अशी टीका शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून केली आहे.

“बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची पहिली फेरी संपली आहे. पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांनी बिहारच्या प्रचार सभात लोकांना विचारलं की, तुम्हाला जंगलराज हवं आहे काय ? नको असेल तर भाजप आणि जदयुलामतदारन करा. गेल्या 15 वर्षांपासून बिहारमध्ये नितीश कुमारांचेच राज्य आहे याचा विसर या मंडळींना पडलेला दिसत आहे. मुंगेर जिलह्यात दुर्गा विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी गोळीबार केला. मुर्ती खेचून विसर्जन करायला लावलं. गोळीबारात एकजण ठार तर 15 जण जखमी झाले. पोलिसांचं हे कृत्य जनरल डायरला लाजवणारं होतं. दुर्गापूजेच्या विसर्जन यात्रेत हा सर्व गोंधळ सुरू झाला आणि पोलिसांनी सरळ बंदुका चालवल्या. अनुरगा पोद्दार हा 18 वर्षांचा तरुण फक्त यात मारला गेला. दुर्गापूजा विसर्जनाबाबत हा गोंधळ, हिंसाचार व पोलीसी गोळीबार प. बंगाल सारख्या राज्यात घडला असता तर एव्हाना घंटा बजाव छाप पोकळ हिंदुत्ववाद्यांनी नंनानाच केला असता.”

“दुर्गापूजेत गोळीबार म्हणजे हिंदुत्वावर हल्ला असल्याचं सांगत थयथयाट केला असता. प. बंगाल, महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून तेथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली असती. या गोळीबाराची सीबीआय चौकशी तरी कराच या मागणीसाठी भाजप शिष्टमंडळ राजभवनात चहापानास गेलं असतं. परंतु काय हो घंटाबाज हिंदुत्ववाद्यांनो, मुंगेरात दुर्गापूजा मिरवणुकीवर झालेल्या गोळीबारावर तुमची थोबाडं बंद का आहेत ?” असा सवालही शिवसेनेनं केला आहे.

You might also like