शिवसेनेचा सवाल : राज्यपाल, विरोधी पक्ष राजधर्म कधी पाळणार ?12 सदस्यांची यादी राजभवनात कुणाच्या खुर्चीत दडवून ठेवली ?

पोलीसनामा ऑनलाईनः पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विधिमंडळाचे अधिवेशन बंद पाडण्याची भाषा करत विरोधी पक्षाने वादळी हवेचा फुगा फुगविण्याचा प्रयत्न केला. पण या फुग्यास वनमंत्री संजय राठोडांच्या राजीनाम्याने टाचणी लावली. महाविकास आघाडीच्या हाती राजदंड आहेच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजधर्माचे पालन करीत आहेत. अर्थात हा धर्म पाळण्याची जबाबदारी विरोधी पक्षाचीदेखील आहेच व भाजपने नेमलेल्या राज्यपाल महोदयांची तर जास्तच आहे. राज्यपालनियुक्त 12 सदस्यांची यादी राजभवनात कुणाच्या खुर्चीत दडवून ठेवली आहे? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. आमदारांच्या नियुक्त्या लटकवून ठेवणे हे घटनेच्या विरुध्द आहे. राजधर्माचे पालन न करण्याचे हे काम आहे. मुख्यमंत्र्यांनी राजधर्माचे पालन केल्याने विरोधकांच्या तथाकथित वादळातील हवाच गेली. राज्यपाल, विरोधी पक्ष राजधर्म कधी पाळणार? असा सवाल शिवसेनेने सामनाच्या संपादीयमधून केला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही, असा शड्डू विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी ठोकला होता. अर्थात या प्रकारची भाषा विरोधी पक्षनेत्यांच्या तोंडी शोभत नाही. पूजा चव्हाण प्रकरण नक्कीच गूढ आणि चिंताजनक आहे. विरोधी पक्षाला तिच्या मृत्यूची चिंता वाटणे स्वाभाविक आहे, पण चिंता वाटणे आणि त्याचे भांडवल करणे यात फरक आहे. अशी चिंता मग राज्यातील प्रत्येक संशयास्पद मृत्यूप्रकरणी वाटायला हवी. दादरा-नगर हवेलीचे लोकप्रिय खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन गूढ पद्धतीने आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत भाजपच्या प्रमुख लोकांचा उल्लेख आहे. डेलकरांच्या आत्महत्येस जबाबदार असणा-यांना अटक का करीत नाही? हा प्रश्न विचारून भाजपने सरकारला भंडावून सोडले पाहिजे. पण डेलकर मेले तरी चालतील, पूजा चव्हाणच्या मृत्यूचे मात्र भांडवल करायचे हेच विरोधकांचे वादळ दिसते अशी टीका शिवसेनेने केली आहे.

चर्चेतून मार्ग निघतो, आंदोलन करण्याची गरज नाही, असे पंतप्रधान नरेंद मोदी वारंवार सांगतात. पण भाजप नेते ऐकायला तयार नाहीत. राज्यात विरोधकांनी उचलून धरावे असे अनेक प्रश्न आहेत. राज्यात कोरोना संसर्गाचे संकट गंभीर असताना राज्यातील काही पुढारी, नेते आपण मास्क वगैरे लावणार नाही, असे जाहीरपणे सांगत सुटले आहेत, यावरसुध्दा चर्चा होणे गरजेचे असल्याचे सांगत शिवसेनेने अप्रत्यक्षपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

खासदार उदयनराजे भोसले हे मराठा आरक्षणाचा गुंता सोडविण्यासाठी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या प्रश्नावर विधिमंडळात चर्चा घडवून मार्ग शोधला पाहिजे. धनगर आरक्षणाचाही तिढा कायमच आहे. वीज बिलांचा मुद्दा आहेच. शेतक-यांचे प्रश्न आहेत. काही विषयांवर शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा प्रश्न आहे. पेट्रोल दरवाढीने शंभरी पार केली. देशभरातील विरोधी पक्ष त्यावर आंदोलन करताना महाराष्ट्रातला विरोधी पक्ष मात्र याबाबत थंड गोळा होऊन पडला आहे. हे कसले लक्षण मानावे? निदान उद्याच्या विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षाने पेट्रोल-डिझेल दरवाढीवर एखादा सभात्याग तरी करावा. म्हणजे विरोधी पक्षाच्या या संतप्त भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांना कळवतील असे शिवसेनेने म्हटले आहे.