… तर देशाला महागात पडेल, दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेचा इशारा

पोलीसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब व हरयाणातील शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर नेटाने थांबला आहे व तो त्यांच्या मागण्यांसाठी जिद्दीने लढतो आहे. तो पंजाबचा आहे म्हणून त्यास देशद्रोही, खलिस्तानवादी ठरवायचे हा विचार दळभद्रीपणाचेच लक्षण असल्याची टीका शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर केली आहे. खलिस्तानचा विषय संपला आहे. त्या अंधारयुगातून बाहेर पडण्यासाठी इंदिरा गांधी, जनरल अरुणकुमार वैद्य यांनी प्राणांचे बलिदान दिले, पण खलिस्तानचा विषय आज भाजपवाले नुसते उकरून काढत नाहीत तर त्यांना ती ठिणगी टाकून पंजाबात स्वतःचे राजकारण सुरू करायचे आहे. पंजाबातील ही थडगी पुन्हा उकरून काढली तर देशाला भारी पडेल अशा इशाराही शिवसेनेने दिला आहे.

एखादा विषय हातातून निसटला की, ‘हिंदुस्थान-पाकिस्तान’ हा खेळ सुरू करायचा ही त्यांची हातचलाखी ठरलेलीच आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातही पाकिस्तान झिंदाबाद, स्वातंत्र्य, आजादीच्या नावाने घोषणा दिल्या गेल्याचे जे पुरावे समोर आणले गेले ते बोगस ठरले. आपलीच माणसे मेकअप करून घुसवायची व हे असे प्रकार घडवायचे. त्यामुळे देशाची एकात्मता, शांतता, अखंडता उद्ध्वस्त होत असते. तसेच प्रत्येक वेळी बंदुकांनीच काम होते असे नाही. दिल्लीच्या सीमेवर आपल्याच शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवून मारले जात आहे, तर कश्मीर सीमेवर अतिरेकी आमच्या सैनिकांचे बळी घेत आहेत. तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा! त्याशिवाय पर्याय नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.

सरदार पटेल हे पोलादी पुरुष होतेच. पोलादी पुरुषाचा अतिभव्य पुतळा नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी गुजरातमध्ये उभा केला. सरदार पटेल हे शेतकऱ्यांचे नेते होते. ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी केलेली साराबंदी चळवळ, बार्डोलीचा सत्याग्रह निर्णायक ठरला, शेतकऱ्यांचे आंदोलन उभे करून त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीस जेरीस आणले, पण दिल्लीच्या सीमेवर आणि देशाच्या सीमेवर सध्या जो अंदाधुंद प्रकार सुरू आहे, त्यामुळे पोलादी पुरुषाच्या पुतळ्याच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या असतील असे सेनेने म्हटले आहे.
चीनचे सैन्य हिंदुस्थानी हद्दीत लडाखमध्ये घुसले आहे. त्याचवेळी पंजाब आणि हरयाणाच्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर अडवून ठेवले आहे. नुसतेच अडवले नाही, तर त्यांच्यावर बळाचा, साम- दाम-दंड-भेदाचा प्रयोग केला जात आहे. शेतकऱ्यांना दिल्लीतील रामलीला मैदानावर जायचे आहे, पण केंद्राने लाठय़ाकाठय़ा, थंड पाण्याचे फवारे, अश्रुधुराची नळकांडी फोडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. कडाक्याच्या थंडीत पहाटे शेतकऱ्यांवर थंड पाण्याचा मारा करणे हे अमानुष आहे. तरीही शेतकरी मागे हटायला तयार नाहीत. शेतकरी इतके आक्रमक व जिद्दीला कधीच पेटले नव्हते. आता शेतकरी ऐकत नाहीत व केंद्र सरकारविरोधात, पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात हंगामा करीत आहेत म्हटल्यावर भाजपने व केंद्रीय यंत्रणांनी त्यांचे नेहमीचे जंतर मंतर, जादुई हातचलाखीचे प्रयोग सुरू केले. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी असे बेताल विधान केले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनात खलिस्तानवादी घुसले आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांचे आंदोलन देशद्रोही आहे, असेच यांना म्हणायचे आहे का, भाजपची भूमिका देशातले वातावरण चिघळवणारी आहेच, पण नव्या अराजकाला आमंत्रण देणारी असल्याची टीकाही सेनेने केली आहे.

गेल्या महिनाभरात महाराष्ट्राच्या 11 सुपुत्रांना वीरमरण
श्रीनगर, कश्मीर खो-यात जवानांची बलिदाने सुरूच आहेत. गेल्या महिनाभरात महाराष्ट्राचे 11 सुपुत्र देशासाठी वीरगतीला प्राप्त झाले. तर काल छत्तीसगढ येथील नक्षलवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे जवान नितीन भालेराव यांना वीरगती प्राप्त झाली. दोन दिवसांपूर्वी 21 वर्षांचे यश देशमुख श्रीनगरात अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. कोल्हापूरचे संग्राम पाटील पाकडयांच्या चकमकीत शहीद झाले. कोल्हापूरचेच ऋषीकेश जोंधळे व नागपूरचे भूषण सतई पाकड्यांना उत्तर देताना वीरगतीस प्राप्त झाले. देशासाठी बलिदान देणे, त्याग करणे ही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची परंपराच आहे, पण राज्यकर्ते असे किती बळी व बलिदाने देणार आहेत? महाराष्ट्रासह देशभरात राजकीय विरोधकांना चिरडण्यासाठी भाजप सरकार सर्व प्रकारचे हातखंडे वापरत आहे. मग ती जिद्द देशाच्या दुश्मनांशी लढताना का दिसत नाही, अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.