‘कलम 370 हटवून अन् कश्मीरचे विभाजन करून देखील प्रश्न जैसे थे’, शिवसेनेची मोदी सरकारवर टीका

पोलिसनामा ऑनलाईन – जम्मू काश्मीरमधील सोपोर येथे दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या आजोबांच्या छातीवर बसलेल्या चिमुरड्याचा फोटो सध्या चर्चेत आहे. भाजपा नेते संबित पात्रा यांनी हा फोटो शेअर केल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकादेखील होत आहे. दरम्यान शिवसेनेने या घटनेवरुन सामना संपादकीयच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

दिल्लीत इतके मजबूत सरकार असूनही कश्मीर खोर्‍यात शांततेचा चोथा का झाला आहे? असा सवाल विचारला आहे. मृत आजोबांच्या छातीवर रडणार्‍या नातवाचे चित्र प्रसिद्ध करणार्‍या केंद्रीय मंत्र्यांना एक कळायला हवे, हे चित्र म्हणजे केंद्र सरकारची नामुष्की ठरू शकेल. हे चित्र जेव्हा सरकारचा अधिकृत मंत्रीच त्याच्या ट्विटर हँडलवर टाकतो तेव्हा कश्मीर खोर्‍यातील अशा रक्तपाताची जबाबदारी सरकारवर येते. बाजूला बंदुकांच्या फैरी झडत आहेत हे चित्र देशाच्या इभ्रतीला व हिंमतबाज सरकारच्या प्रतिष्ठेला डाग लावणारे आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. कश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी आणि कारवाया सुरूच आहेत. पुन्हा दहशतवादी हल्ल्यात जवानांबरोबर स्थानिक नागरिकांनाही लक्ष्य केले जात आहे. सोपोरमधील दहशतवादी हल्ल्यात बशीर अहमद खान या आजोबांचा मृत्यू झाला तो त्यातूनच. म्हणजे कश्मीर ‘जैसे थे’च आहे.

जवानांनी आपला जीव धोक्यात घालून आजोबांच्या छातीवर बसून रडणार्‍या नातवाला वाचविले हे खरेच, पण त्या नातवाचे भविष्य काय? सरकारकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे? लडाखमध्ये चीनच्या आणि कश्मीर खोर्‍यात पाकड्यांच्या कुरापती सुरूच आहेत. हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने बघणे हा त्यांचा धंदा असला तरी आता त्यांना उलथवून टाकावेच लागेल. सोपोर जिल्ह्यात अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यात ‘सीआरपीएफ’चा एक जवान हुतात्मा झाला. या हल्ल्यात त्याच परिसरातील एक ज्येष्ठ नागरिक मारला गेला. कश्मीर खोर्‍यात असे रक्ताचे सडे रोजच पडत आहेत व निरपराध लोकांचे प्राणही जात आहेत. नोटाबंदी केल्याने कश्मीर खोर्यातील अतिरेकी चळवळीस लगाम बसेल, बनावट नोटांचा सुळसुळाट थांबेल, असे ठासून सांगितले गेले ते फोल ठरले. कश्मीर खोर्यात अतिरेक्यांच्या कारवाया व बनावट नोटांचा सुळसुळाट जास्तच वाढला आहे. गृहखात्याला हे सगळ्यात मोठे आव्हान आहे. 370 कलम हटवून आणि कश्मीरचे विभाजन करूनही प्रश्न जैसे थे आहेत, अशी टीका शिवसेनेने केली आहे.