‘एकेकाळी काँग्रेसनं निवडणुकीत दगड उभा केला तरी निवडून येत’, आता देशात मजबूत विरोधी पक्षाची गरज; शिवसेनेचा पुन्हा एकदा पुनरूच्चार

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – अर्थसंकट, बेरोजगारी, महागाई, कोरोनामुळे पडत असलेल्या प्रेताचा खच यामुळे केंद्र सरकारची लोकप्रियता घसरत चालली आहे. लोकांच्या मनात सरकरविषयी रोष आहे.अशावेळी सर्वच विरोधी पक्षांनी ट्विटरच्या फांदीवरून उतरून मैदानात उतरले पाहिजे. मैदानात उतरणे म्हणजे गर्दी करणे नाही. सध्या कोरोनाचा काळ आहे. त्यामुळे सर्वच विरोधी पक्षांना रोज करावे लागेल म्हणजे सरकारला प्रश्न विचारून भंडावून सोडणे. काँग्रेसने पुढाकार घ्यावा. सोनियांना बहुधा हाच संदेश द्यायचा आहे. असे सांगत शिवसेनेने पुन्हा एकदा मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून देशात मजबूत विरोधी पक्षाची गरज बोलावून दाखवली.

काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण प्रभाव झाला आहे. या प्रभावातून योग्य तो धडा घेऊन पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वस्तुस्थितीला सामोरे जावे लागेल, असे त्या म्हणाल्या. पक्षात आवश्यक त्या सुधारणा कराव्या लागतील.असं महत्त्वपूर्ण वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यायलाच हवी, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

कोरोनाचे कारण सांगतात काँग्रेस अध्यक्षपदाची निवड तिसरयांदा पुढे ढकलली. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून सोनिया गांधीच काम पाहत राहतील. अध्यक्षपद सोडल्यापासून राहुल गांधी रिकामेच आहे. काँग्रेसमधील ‘जी-23’ गटाने पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असल्याचे मत वारंवार मांडले. पक्षाला अध्यक्ष नसल्याने लोकांसमोर कसे जायचे, हा मुद्दा या बंडखोर गटाने उपस्थित केला, पण अध्यक्ष असला नसला तरी पक्ष हा चालतच असतो. जमिनीवरचे कार्यकर्ते पक्षाचा झेंडा पुढे नेत असतात. एक काळ असा होता की, काँग्रेसने निवडणुकीत दगड उभा केला, तरी लोक त्या दगडास निवडून देत होते. आज चित्र तसे नाही. नेमका हाच मुद्दा कार्य समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी उपस्थित केला, असं शिवसेनेने सांगितलं आहे. आपण ‘सामना’ वाचत नसल्याचा टेंभा महाराष्ट्रातले काँग्रेस पुढारी मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात, हे काल पुन्हा दिसून आले, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लगावला आहे.

आसाम, केरळमध्ये चांगली लढत देऊनही काँग्रेसला सत्तेवर का येता आले नाही? हा प्रश्न ‘सामना’ने याच स्तंभातून विचारला. नेमका काँग्रेस कार्य समितीत श्रीमती सोनिया गांधी यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. केरळ, आसामातील पराभव त्यांना टोचला व त्यांनी त्याबाबत प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील जुन्याजाणत्या काँग्रेस पुढाऱ्यांनीही ‘सामना’ वाचून सोनियांपर्यंत लोकभावना पोहोचवल्या असतील तर चांगलेच आहे. पक्षाला प. बंगालात खातेही उघडता आले नाही, यावर खंत व्यक्त केली गेली. आता सोनिया गांधी यांनी खंत व्यक्त करणे व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्याबाबत सवाल विचारणे हा त्यांचा अधिकार आहे. सोनिया यांनी पक्षाच्या दुर्गतीवर व्यक्त केलेली चिंता व अस्वस्थता दुर्लक्षित करता येणार नाही, असं शिवसेनेने सांगितलं आहे. मानवी जीवनात वाईट पुष्कळ असते, चांगले थोडे असते. संस्थेच्या जीवनात चांगले पुष्कळ असू शकते, वाईट कमी असू शकते. व्यक्ती अगर संस्था यांच्या जीवनात जेव्हा संघर्ष उभा राहतो व त्यास तोंड देण्यासाठी जेव्हा ते सर्व सामर्थ्यानिशी उभे राहतात आणि आयुष्याची बाजी लावून लढतात, तेव्हा ते सारे मोठे होतात.

दुबळे असून कसे रणधुरंधर योद्धय़ासारखे लढतात. स्वातंत्र्य लढय़ातून काँग्रेस पक्ष लोकांत व देशात रुजला. स्वातंत्र्य लढय़ातील संघर्षाने अनेक सामान्य कार्यकर्तेही मोठे झाले, पण त्या छोटय़ांचे नेतृत्व करणारी मंडळी थोर होती. दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, राम मनोहर लोहिया, नाना पाटील हे सर्व एके काळी काँग्रेसचे धुरंधर होते. महाराष्ट्रातील शरद पवार यांनी उभी हयात काँग्रेस पक्षात घालवली. आज अशी माणसे काँग्रेस पक्षात उरली नसतील तर त्यास जबाबदार कोण?, अशी विचारणा शिवसेनेन अग्रलेखातून केली आहे. प. बंगालात ममता बॅनर्जी, आसामात हेमंत बिस्व सरमा, पुद्दुचेरीत एन. रंगास्वामी हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, पण हे तिघेही माजी काँग्रेसवाले आहेत. त्यांना काँग्रेस पक्षातून बाहेर जावे लागले, पण जेथे गेले तेथे त्यांनी स्वतःचे अस्तित्व अधिक तेजोमय केले. ममता बॅनर्जी यांनी मोदी-शहांच्या बलाढय़ सत्तेशी लढा देऊन विजय प्राप्त केला. त्यांचा मूळ पिंड काँग्रेसचाच आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचा त्याग करताच प. बंगालातील काँग्रेसचा डोलाराच कोसळला. काँग्रेस म्हणजे कधीकाळी स्वातंत्र्य आणि संघर्ष होता. आज राहुल गांधींचा लढा एकाकी आहे, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

राहुल गांधी हे त्यांचे काम संयमाने करतात. त्यांच्यावर प्रचंड टीका घाणेरडय़ा शब्दांत होत असताना ते त्यांच्या मुद्दय़ाला धरून लढत राहतात. कोरोना काळात राहुल गांधी यांनी घेतलेल्या अनेक मुद्दय़ांवर सरकार पक्षाकडून टीकेची झोड उठली, पण लसीकरणापासून पुढे इतर अनेक विषयांत सरकारने राहुल गांधींचीच भूमिका स्वीकारली. राहुल गांधी हेच आजही काँग्रेसचे सेनापती आहेत. त्यांचे सरकारवरील हल्ले अचूक आहेत. हिंदुस्थानला जी जगभरातून परदेशी मदत मिळू लागली आहे, त्यावर सरकारची छाती अकारण गर्वाने फुलली तेव्हा त्या फुगलेल्या छातीचा फुगा राहुल गांधी यांनी सहज फोडला. विदेशी मदतीचा गवगवा करणे म्हणजे राष्ट्राभिमान किंवा स्वाभिमान नाही, असे ते म्हणाले व त्यावर राष्ट्रीय मंथन झाले, असं शिवसनेन अग्रलेखात म्हंटले आहे.