PM मोदींच्या ‘मन की बात’वर शिवसेनेचे टीकास्त्र, म्हणाले – ‘…तर आज कोरोनाच्या त्सुनामीत देशाला गटांगळ्या खाण्याची वेळच आली नसती’

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 25) मन की बातमधून देशातील जनतेशी संवाद साधला. यावरून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीकास्त्र सोडले आहे. तज्ञांनी खूप आधी दिलेला इशारा गांभीर्याने घेतला असता आणि आता आलेल्या दुसऱ्या लाटेची मन की बात वेळीच समजून घेतली असती तर आज कोरोनाच्या त्सुनामीत देशाला गटागंगळ्या खाण्याची वेळ आली नसती, अशी टीका शिवसेनेने केली आहे. कोरोनाविरोधात केंद्र आणि राज्य सरकारे लढा देण्याचा पूर्ण प्रयत्न करीत असल्याची ग्वाही पंतप्रधानानी दिली. ही लढाई सुरू आहे हे खरेच, पण ती सुरू होण्यापूर्वी केंद्राने काही गोष्टींची पूर्वखबरदारी, पूर्वतयारी केली असती तर? हे संकट आलेच नसते असे शिवसेनेने सामनाच्या संपादकीयतून म्हटले आहे.

अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ मेट्रिक्स ऍण्ड इव्हॅल्यूशनने दिलेला इशारा तर धडकी भरवणारा आहे. संस्थेच्या निष्कर्षानुसार मे महिन्यात भारतात दररोज मृतांचा आकडा 5 हजारांवर पोहोचू शकतो. 12 एप्रिल ते 1 ऑगस्ट 2021 या कालावधीत देशातील कोरोना मृतांची संख्या 3 लाखांच्या वर जाऊ शकते. वॉशिंग्टनच्या या संस्थेने दिलेला हा इशारा आता तरी केंद्राने गांभीर्याने घ्यायला हवा. गेल्या वर्षीही कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी परदेशी संस्थांनी असे इशारे दिले होते. पण सुदैवाने परिस्थिती आटोक्यात राहिली होती. मात्र सध्याची परिस्थिती तशी नाही हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. कोरोनाची दुसरी लाट म्हणजे त्सुनामी ठरेल, असे शिवेसेनेने म्हटले आहे.

देशात आज अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांचे तडफडून मृत्यू होत आहेत. आता सरकारतर्फे देशभरात ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेद्वारे केला जात आहे, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हे सगळे ठीकच आहे, पण हाताबाहेर गेलेल्या कोरोनाचे काय? कोलमडलेली आरोग्य व्यवस्था, उपचारांअभावी होणारे रुग्णांचे मृत्यू आणि त्यांच्या उद्ध्वस्त कुटुंबांचे काय? असे सवाल शिवसेनेने विचारले आहेत. आग्र्यातील एक बातमी मन विषण्ण करणारी आहे. बेड न मिळाल्याने ऑक्सिजनअभावी तडफडणा-या पतीला रिक्षातच आपल्या तोंडाने श्वास देऊन त्याचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न त्याची पत्नी करीत होती. ही बातमी कोरोनाबाबतच्या सर्वच सरकारी दाव्यांचा पर्दाफाश करणारी असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.