लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर करून घेत नाही ना ? : शिवसेना

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येबाबत सीबीआय चौकशाीची मागणी करणारे पार्थ पवार हे राजकारणात नवीन आहेत. लोकसभेची त्यांची उंच उडी चुकली आहे. त्यांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. घरातच राजकीय व्यायामशाळा आहे. त्यामुळे मल्लखांब वगैरे कसरतीचे प्रयोग करून कसदार बनायची संधी आहे. मात्र, त्यांच्या लहान वयाचा वापर कोणी करुन तर घेत नाही ना अशी शंका शिवसेनेने उपस्थित केली आहे. सामना संपादकीयच्या माध्यमातून यावर भाष्य केले आहे.

शरद पवारांनी पार्थ पवार यांना अपरिपक्व म्हटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाविकास आघाडीत मित्रपक्ष असणार्‍या शिवसेनेने शरद पवारांचे बोलणे हे आजोबांचा सल्ला म्हणजेच आशीर्वाद यादृष्टीने घेतले तर मनावरचा ताण कमी होईल. सीबीआयचा घाव घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता जखमी करायची असा डाव पडद्यामागून रचला जात आहे, हे समजून घेतले पाहिजे. त्याकरिता लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करून घेत नाही ना? अशी शंका घेण्यास वाव असल्याचंही शिवसेनेने म्हटले आहे.

पक्षाची धुरा सांभाळणाऱयांना अनेकदा ‘कटू’ बोलावे लागते. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा हे कडू घोट स्वकीयांना पाजले आहेत. जाहीरपणे कान उपटले आहेत. महात्मा गांधी, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी इतकेच काय, पंतप्रधान मोदी यांनीही वेळोवेळी स्वकीयांना कडू कारल्याची भाजी खायला घातलीच आहे. प्रकृतीला ती बरी असते. ज्येष्ठांनी असेच वागायचे असते. शरद पवार वेगळे वागले नाहीत, असे सांगत शिवसेनेने शरद पवार यांची बाजू घेतली आहे. चोवीस तास ‘सबसे तेज’ स्पर्धेतील वृत्तवाहिन्यांना मिरची मसाला हवा असतो.

त्यामुळे हे लोक त्यांच्या उदरभरणासाठी अशी कृत्रिम वादवादळे निर्माण करीत असतात. आता निमित्त पार्थ यांचे आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे अधूनमधून पत्राद्वारे किंवा सोशल मीडियावर वगैरे आपली मते मांडत असतात. ती अनेकदा दखलपात्र असतातच असे नाही. अजित पवार यांचे पुत्र काहीतरी मत व्यक्त करतात एवढ्यापुरतेच त्याचे महत्त्व, असे शिवसेनेने सांगितले आहे.