‘राहुल गांधीना कामच करू द्यायचे नाही, असा विडाच काही लोकांनी उचललाय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राजस्थानातील फोन टॅपिंगने अनेकांचे पितळ उघडे झाले, पण काँगेस पुढार्‍यांचे आपापसातील संभाषण कोणी चोरून ऐकून राहुल गांधींपर्यंत पोहोचविल्यास अनेक गौप्यस्फोट होतील. पण त्यांना धड कामच करू द्यायचे नाही, असा विडाच काही लोकांनी उचलला आहे. फोन टॅपिंग हा गुन्हा व व्यक्तिगत स्वातंत्र्यावर आघात आहेच. लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले सरकार पैशांच्या बळावर पाडणे हा घटनाद्रोह आहे. त्यामुळे कोणता गुन्हा मोठा हे ठरवायला हवे, असे शिवसेनेने सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे.

राजस्थानमधील राजकीय युद्धाचे कवित्व संपलेले नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर सचिन पायलट यांची सौदेबाजी सुरू होती ती पैशांच्या देवाणघेवाणीच्या टोकापर्यंत होती. म्हणजे राजस्थानचे गेहलोत सरकार हे पैसे चारून पाडायचे, घोडेबाजार करून बहुमत विकत घ्यायचे हे ठरले होते. सचिन पायलटांचे अन्यायाविरुद्ध बंड वगैरे प्रकरण झूठ होते याचा पर्दाफाश मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला. पायलट व भाजप नेत्यांमधील फोन संभाषण समोर आणले. ते धक्कादायक तितकेच खळबळजनक आहे. गेहलोत सरकार पाडण्यासाठी केंद्रीय सत्तेचा दबाव व पैशांचा वापर झाला. तो काँगेसने उधळून लावला. भाजपचा कांगावा असा की, राजस्थान सरकारने बेकायदा फोन टॅपिंग केले.

या फोन टॅपिंगची चौकशी आता केंद्रीय गृहखाते करणार असून ते योग्यच आहे. अशा प्रकारे राजकीय पुढार्‍यांचेच काय, तर कोणाचेही खासगी संभाषण चोरून ऐकणे हा गुन्हाच आहे. हा एखाद्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घालाच आहे. त्यामुळे केंद्रीय गृहखाते याबाबत चौकशी करणार असेल तर त्यात चुकीचे काय? प्रश्न इतकाच आहे की, गेहलोत सरकारने हे फोन संभाषण ऐकले असेल तर अशी कोणती आणीबाणीची स्थिती देशात किंवा राज्यात उद्भवली होती? राजस्थानात बहुमताचे सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू होत्या व त्यासाठी आमदारांची खरेदी चढया भावाने सुरू होती. सचिन पायलट यांच्या बंडामागे नीतिमत्ता कमी व पैशांची फूस जास्त होती. अशी टीका शिवसेनेने केली आहे.