‘टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान मोदीही….’, शिवसेनेचा घणाघात

पोलीसनामा ऑनलाईन – टीएमसीच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव करून पश्चिम बंगालवर भाजपचा विजयध्वज फडकवायचाच या जिद्दीने भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व बंगालच्या मैदानात उतरले आहे. स्वतः गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा व इतर अनेक नेत्यांचा बंगालमधील राबता वाढला आहे. तसेच टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीही काल कोलकात्यात येऊन गेले. निवडणुकीमध्ये कोणीतरी जिंकणार व कोणीतरी हरणारच आहे. भारतीय लोकशाही ‘ट्रम्प छाप’ नाही. कौल हा स्वीकारावाच लागतो. पण कौल आपल्या बाजूने वळावा, यासाठी जे अघोरी प्रयोग आपल्या लोकशाहीत केले जातात ते असह्य ठरतात. उत्तर प्रदेश, बिहारप्रमाणेच प. बंगालात भाजपने धार्मिक फाळणी सुरू केली आहे. त्यास काही प्रमाणात ममता बॅनर्जी जबाबदार असल्याची टिका शिवसेनेने ( Shivsena ) सामनातील संपादकीयच्या माध्यमातून केली आहे. पण शेवटी ही बंगालची वाघीण रस्त्यावर लढा देणारी आहे व ती लढत राहील, असा विश्वास शिवसेनेने ( Shivsena ) व्यक्त केला आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने भाषणास नकार दिला. यावरुन शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. जे महाराष्ट्रात घडले, तेच प. बंगालात घडताना दिसत आहे. स्वतःचे काहीच नाही. तसेच ज्यांच्या विरोधात लढायचे आहे, त्यांची लोक फोडून आपली फौज तयार करण्याचे काम सुरु आहे. बिहारलाही तेच झाले. आता प. बंगालातही तृणमूल फोडून विजय मिळविण्यासाठी धडपड सुरु आहे. तृणमूल काँग्रेस फोडून भाजपमध्ये मेगाभरती सुरू आहे. ममता कॅबिनेटमधील वनमंत्री रजीब बॅनर्जी यांनी राजीनामा दिला आहे. त्याआधी आणखी दोन प्रमुख मंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तृणमूल काँग्रेस फोडायची, खिळखिळी करायची व तृणमूलचेच आमदार फोडून त्यांना भाजपची उमेदवारी द्यायची असा प्रकार सुरु आहे. जे महाराष्ट्रात घडले, तेच प. बंगालात घडताना दिसत असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

हिंदुत्वाच्या मुद्दय़ांवर ठरवून ठिणगी टाकायची, हे भाजपाने ठरवलेले आहे. तसे नसते तर कोलकात्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती कार्यक्रमात वादाची ठिणगी पडली नसती. शासकीय कार्यक्रमात पंतप्रधान व्यासपीठावर असताना मुख्यमंत्री ममता बोलायला उभ्या राहिल्या, तेव्हा ‘जय श्रीराम’चे नारे गर्दीतील लोकांनी दिले. बॅनर्जी यावर चिडल्या व हा आपला अपमान असल्याचे त्यांनी माईकवरूनच सांगितले. ममता बॅनर्जी यांचा ‘वीक पॉइंट’ बंगाल भाजपाने ओळखला असून निवडणुका होईपर्यंत ते अशा नाजूक विषयांवर मर्मभेद करत राहणारच आहेत. ‘जय श्रीराम’च्या ना-यावर ममता बॅनर्जी चिडू नयेत, या मताचे आम्ही आहोत. उलट त्यांच्या सुरात सूर मिसळला असता तर डाव समोरच्यांवरच उलटला असता, असे शिवसेनेने म्हटले आहे.

प. बंगालात लोकसभा निवडणुकीआधी दुर्गापूजा व विसर्जनावरून भाजपने तद्दन खोटा प्रचार केला व बॅनर्जी या मुख्यमंत्री असूनही त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचत नव्हता. भाजपचे प्रचाराचे गुप्त मिशन असते. ममता व इतरांचे सगळे खुल्लमखुल्ला असते. लोकसभेत भाजपला 18 जागा जिंकता आल्या. ही बाब ममतादीदींसाठी चिंतेची आहे.

महाराष्ट्राच्या राजभवनात भाजपप्रेमापायी जे सुरू आहे, तेच अधिक प्रखरतेने कोलकात्याच्या राजभवनात सुरू आहे. प. बंगालात अल कायदाचे जाळे वेगाने पसरत असल्याचा आरोप राज्यपाल जगदीश धनकर यांनी जाहीरपणे केला. बॅनर्जी यांचे सरकार आणि प्रशासन काय करीत आहे, अशी राजकीय चिंता त्यांनी व्यक्त केली. राज्यपालांचे काम हे गृहखात्यात अहवाल पाठवण्याइतकेच आहे. प. बंगालात अल कायदाचे जाळे वाढले आहे, याबाबतचा तपशील राज्यपालांनी कोणत्या माध्यमातून गोळा केला? एखादी खासगी यंत्रणा नेमून त्यांनी अल कायदाबाबत माहिती गोळा केली असेल तर त्यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्याशी त्याबाबत चर्चा करायला हवी. तसे न करता राज्यपाल ही माहिती प्रसिद्धीमाध्यमांना देतात व लोकांत भय निर्माण करतात, हे मन साफ असल्याचे लक्षण नसल्याचा टोला सेनेने लगावला आहे.