… म्हणूनच उद्धव ठाकरेंनी माझी नियुक्ती केली आहे : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंजाब, हरियाणामधील शेतकरी महाराष्ट्राप्रमाणे आहे. हा देश सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, जी प्रमुख राज्यं आहेत त्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणाचा समावेश आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का?”. असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना विचारला. केंद्राच्या नव्या शेतकी कायद्यांच्या विरोधातील आंदोलन शेतकऱ्यांनी सुरुच ठेवलं आहे. या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांचं नाव घेतलं की कानाला त्रास होतो अशी टीका केली आहे. यावर पाटील यांनी केलेल्या टीकेला राऊत यांनी उत्तर दिले. “चांगली गोष्ट आहे. कानाला, पोटाला, डोळ्याला, ह्रदयाला त्रास झालाच पाहिजे. म्हणूनच माझी नेमणूक उद्धव ठाकरेंनी केली आहे”. उर्मिला मातोंडकरांच्या शिवसेना प्रवेशासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “त्या शिवसैनिकच आहेत. बहुतेक उद्या प्रवेश करतील. त्यांच्यामुळे महिला आघाडी मजबूत होईल”.

यावेळी राऊत पुढे बोलताना म्हणाले कि, सर्वांनीच शेतकऱ्यांना समर्थन दिलं पाहिजे. सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समर्थन केलं पाहिजे. शेतकऱ्यांशी तिथे जाऊन चर्चा केली पाहिजे. तुम्ही जेव्हा सत्तेत नव्हता आणि दिल्लीत येण्याचा मार्ग तयार करत होतात तेव्हा याच शेतकऱ्यांवर अत्याचार होणार नाही अशा घोषणा दिल्या होत्या. मग आज दिल्लीच्या सीमेवर आज काय सुरु आहे? शेतकरी दहशतवादी नाही. शेतकरी आहे म्हणून देश आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांनी जगासमोर आदर्श ठेवत शांततेत आंदोलन या देशाच्या इतिहासात कधी झालं नव्हतं. ज्याप्रकारे शेतकऱ्यांवर बळाचा वापर केला जातो हा बळाचा वापर जर चीनच्या सीमेवर केला असता तर लडाखमध्ये चीनचं सैन्य घुसलं नसतं,” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.