‘NDA आणि भाजपमध्ये फार जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले नाहीत’ : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जेव्हा शिवसेना बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एनडीए आणि भाजपमध्ये फार जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले नाहीत असंही ते म्हणाले आहेत. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी कृषी विधेयकांना विरोध दर्शवत केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत म्हणाले, “जेव्हा शिवसेना बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली. बाहेर पडली म्हणजे आम्हाला बाहेर पडण्यासाठी भाग पाडण्यात आलं. टीडीपीचं काही नक्की नसतं. ते येऊन जाऊन असतात. फक्त शिवसेना आणि अकाली दल एनडीएमधील सर्वात जुने जाणते आणि निष्ठावान होते. बाकी नितीश कुमार येऊन जाऊन असतात. त्यांचं उद्याचं काही सांगू शकत नाही. माझ्या माहितीप्रमाणे एनडीए आणि भाजपमध्ये फार जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले नाहीत.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “आम्ही अद्यापही जुने संबंध विसरू शकत नाही. आम्ही एनडीएचा महत्त्वाचा शेवटचा स्तंभ होतो. एनडीए कृषी विधेयकांवर चर्चा व्हायला हवी होती. सर्वपक्षीय तर सोडून द्या पण जर एनडीएमध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित काही निर्णय होत आहेत तर धोरणात्मक चर्चा झाली असती तर बरं झालं असतं” असं मतही राऊतांनी यावेळी व्यक्त केलं.