‘महाविकास’चे सरकार देशातील सर्वांत स्थिर आणि मजबूत सरकार; दानवेंना संजय राऊत यांचे प्रत्युत्तर

पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचे सरकार देशातील सर्वांत स्थिर आणि मजबूत सरकार असल्याचे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. त्याचसोबत हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी येत्या दोन-तीन महिन्यांत राज्यात भाजपचे सरकार येईल, असा दावा केला होता. त्यावर राऊत यांनी वार्ताहरांना बोलताना प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत यांनी म्हटलं की, “निराश झाल्याने तसेच सर्व प्रयत्न फसल्याने विरोधी पक्षाचे नेते असे वक्तव्य करतात. हे सरकार चार वर्षे पूर्ण करेल. एक वर्ष पूर्ण झाले आहे आणि चार वर्षे पूर्ण करेल. महाराष्ट्रातील जनता या सरकारसोबत आहे. संपूर्ण देशातील मजबूत सरकार महाराष्ट्रात आहे. तीन दिवसांचे सरकार जे केलं, त्याची आज पुण्यतिथी आहे,” असा चिमटादेखील त्यांनी काढला.

“उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार योग्य पद्धतीने काम करत असून, तीन पक्षांचे सरकार असूनही भक्कम आहे. आता हे तीन महिन्यांत सरकार स्थापन करत असतील, तर त्यांना शुभेच्छा आहेत. स्वप्न पाहण्यातच यांची चार वर्षे निघून जातील,” असेही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावर बोलताना राऊत यांनी सांगितलं, “चंद्रकांत पाटील यांनी वेगळी गुप्तचर यंत्रणा सुरू केली असेल, तर केंद्र सरकारने त्याचा फायदा करून घ्यावा. राजकारणात इतकी मजबूत गुप्तचर यंत्रणा मी पाहिली नाही, असा टोला लगावतच, शरद पवार यांना करायचं ते करतील. ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत,” असेही त्यांनी म्हटलं.