संजय राऊतांकडून देवेंद्र फडणवीसांचं जाहीर कौतुक ! म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   देवेंद्र फडणवीस यांच्यात राष्ट्रीय नेता होण्याची क्षमता आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं जाहीर कौतुक केलं आहे. पुण्यात आोयजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षानं सरकारविरोधात घेतलेली भूमिका लोकशाहीत बसत नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते आहेत. आम्ही कायम त्यांचा सन्मान केला आहे. ते तरूण आहेत. त्यांचा अनुभव वाढत जाणार आहे. भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील नेते होण्याची क्षमता त्यांच्यात आहे. कोणाची सत्ता अमरपट्टा घेऊन आलेली नाही. ध्यानीमनी नसताना ते मुख्यमंत्री झाले. तो धक्का अजूनही ते पचवू शकलेले नाहीत. त्यातून बाहेर पडून त्यांनी पुढील राजकारण केलं पाहिजे” असा सल्लाही त्यांनी यावेळी बोलताना दिला.

पुढं बोलताना राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यात चांगला संवाद आहे असं मला वाटतं. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातही चांगला संवाद असायला हवा. परंतु अनेकदा ही श्रृंखला तुटताना दिसते. विरोधी पक्षानं आपलं महत्त्व ओळखायला हवं. आम्ही 105 असून समांतर सरकार चालवत आहोत असा विचार त्यांनी केला पाहिजे. सत्ता गेली म्हणून राज्याशी शत्रुत्व घेऊ शकत नाही” असंही ते म्हणाले.

राऊत म्हणतात, “राज्य सरकार समोर अनेक आव्हानं आहेत. आव्हानं निर्माण करणं विरोधकांचा अजेंडा आहे. ती आव्हानं आपण राज्यासमोर निर्माण करत आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. चांगल्या विरोधकांचं स्वागत करावं या मताचा मी आहे. विरोधी पक्षच राहू नये असं केंद्रातील सरकारला वाटतं. लोकशाहीत उत्तम विरोधी असायला हवेत. त्याशिवाय राज्य पुढं जात नाही. महाराष्ट्रात विरोधकांची मोठी परंपरा आहे. सध्या दुर्दैवानं आपल्या विचाराचे नाहीत त्यांना राजकारण, समाजकारणात राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका तयार होताना दिसत आहे जे घातक आहे” असंही ते म्हणाले.