ठाकरे सरकारचे रिमोट कंट्रोल की हेडमास्तर ? संजय राऊत यांचा शरद पवारांना प्रश्न

पोलीसनामा ऑनलाईन टीम – स्थापन होण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका आहे. पवार हेच महाविकास आघाडीचे खरे शिल्पकार असल्याचे बोलले जात आहे. पवारांकडे राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल असून पडद्यामागून ते सरकार चालवत असल्याचंही अनेकदा विरोधकांनी म्हटले आहे. यासंदर्भात पवारांची नेमकी भूमिका काय आहे, याचा उलगडा पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमधून होणार आहे.

संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. त्यांनी ट्विटरवर मुलाखतीचे टिझर शेअर केले आहेत. त्यामध्ये त्यांनी शरद पवारांना ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर? असा प्रश्न विचारला आहे. त्यावर शरद पवारांनी काय उत्तर दिले आहे याचा उलगडा मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतरच होणार आहे. या नव्या टिझरमध्ये शरद पवार महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात शिवसेनेचे महत्त्वाचे योगदान होते असे सांगत आहेत. मला जे बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत, त्यांची विचारधारा, कामाची पद्धत ही भाजपाच्या विचाराशी सुसंगत होती असे कधीच वाटले नाही असेही शरद पवारांनी सांगितले आहे. शिवाय तीन विचारांचे तीन पक्ष, पण सगळेजण एका विचाराने मुख्यमंत्र्यांच्या धोरणाच्या पाठिशी आहेत असेही त्यांनी सांगितले आहे.