…म्हणून शिवसेना खा. संजय राऊत प्रचारासाठी बेळगावात जाणार

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन –   बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. निवडणुकीच्या प्रचारामुळे येथील वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेस, भाजपा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारात तिरंगी लढत होत आहे. दरम्यान शिवसेनेने या मतदारसंघातून माघार घेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळकेला जाहीर पाठिंबा दिला आहे. शुभम शेळकेच्या प्रचारासाठी शिवसेना खासदार संजय राऊत हे बुधवारी (दि. 14) बेळगावला जाणार आहेत. याबाबत स्वत: खासदार राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. बेळगाव मतदारसंघात मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. हा मतदारसंघ कायम राखण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपाने येथे सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके हा रिंगणात उतरला आहे. शेळके याने युवकांना एकत्रित करून राष्ट्रीय पक्षात जाणारी तरुण पिढी त्यांनी समितीकडे आणि सीमाप्रश्नाकडे वळविली आहे. मराठी म्हणून जगताना स्वाभिमान बाळगा, कन्नडच्या विरोधात नाही, पण मराठी असल्याचा अभिमान ठेवा, हे विचार तरुणांमध्ये रुजविण्यात तो यशस्वी ठरला आहे. त्यामुळे भाजपा, काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांनाही शेळकेची दखल घेण भाग पडत आहे. बेळगाव मतदारसंघात काँग्रेस, भाजपा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान 17 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल लागणार आहे.